व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर; हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव जाहीर

V Shantaram And Raj Kapoor Awards महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व्ही. शांताराम आणि राज कपूर चित्रपट पुरस्कारांची घोषणा

  • Written By: Published:
Maharashtra Government Announced V Shantaram And Raj Kapoor lifetime Achievement Awards

Maharashtra Government Announced V Shantaram And Raj Kapoor lifetime Achievement Awards : महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व्ही. शांताराम आणि राज कपूर चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांचाही या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने बुधवारी (दि.29) या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.

हृदयनाथ मंगेशकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव

यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या संगीतबद्ध गीतांनी अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. चित्रपटगीतांबरोबरच भक्तिगीते, भावगीते आणि शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांच्या रचनांनी भारतीय संगीतविश्वाला समृद्ध केले आहे.

प्रसाद ओक यांचाही गौरव

मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनाही व्ही. शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनामुळे त्यांची देशभरात चर्चा झाली.

सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथालेखक सलीम खान यांना यंदाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. जावेद अख्तर यांच्यासोबत ‘सलीम-जावेद’ या जोडीने ‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’ यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटांच्या कथा आणि पटकथा लिहिल्या. त्यांच्या लेखनाने हिंदी सिनेमाला नवी दिशा दिल्याचे मानले जाते.

राणी मुखर्जीच्या अभिनयाचाही सन्मान

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांनाही राज कपूर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘ब्लॅक’, ‘हम तुम’, ‘मर्दानी’ यांसारख्या चित्रपटांतील दमदार अभिनयामुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप पाडली आहे. अभिनय क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

चित्रपटसृष्टीतील योगदानाचा सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिले जाणारे व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार हे चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जातात. अभिनय, संगीत, दिग्दर्शन, पटकथा लेखन, निर्मिती आणि चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्कारांद्वारे गौरव केला जातो. यंदाच्या पुरस्कारांमधून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील चार दिग्गज कलाकारांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.

follow us