राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण 22 सप्टेंबरला होणार; “हमसफर’चा होणार गौरव

National Film Awards: उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असणारा हा लघुपट आहे. या लघुपटात मुख्य भूमिका अभिनेते विजय पाटकर यांची आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
National Film Awards

नवी दिल्ली : गुजरातमधल्या केवडिया इथल्या एकतानगर 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 2024 या वर्षातल्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर मराठी लघुपट हमसफरचा गौरवही या सोहळ्यात होणार आहे. (National Film Awards to Be Presented on September 22; ‘Hamsafar’ to Be Honoured)

उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असणारा हा लघुपट आहे. या लघुपटात मुख्य भूमिका अभिनेते विजय पाटकर यांची आहे. तर अभिजित दळवी यांनी लघुपट दिग्दर्शित केलाय. या लघुपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही संवाद नाही. संपूर्ण कथा पात्रांच्या चेहऱ्यावरील भाव आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून पुढे सरकते. ही कथा एका आजोबांची (विजय पाटकर) आणि त्यांच्या जुन्या रेडिओची आहे. हा रेडिओ केवळ एक वस्तू नसून, त्यांच्यासाठी एक हक्काचा ‘हमसफर’ (सोबती) बनला आहे. वस्तूंच्या माध्यमातून जुन्या आठवणी कशा जिवंत राहतात आणि माणसाचे वस्तूंशी किती घट्ट भावनिक नाते जडू शकते, याचे उत्कृष्ट चित्रण यात केले आहे.

यापूर्वीही या लघुपटाला विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. या लघुपटाला ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2025’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ (Best Short Film) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) ‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत या फिल्मचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले आणि तिथे समीक्षकांनी याचे भरभरून कौतुक केले. आणि आता राष्ट्रीय पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अनंत नाग यांचे पाच दशकांचे योगदान
5 दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, अनंत नाग यांनी विविध कलाकृतींद्वारे कन्नड आणि भारतीय चित्रपटसृष्टीत चिरंतन योगदान दिले आहे. हा सन्मान त्यांचा उल्लेखनीय कलात्मक प्रवास आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशातल्या त्यांच्या चिरंतन योगदानाचा गौरव करतो.


भारतीय सर्वोत्कृष्ट कामगिरीचा उत्सव

‘आर्टिकल 370’ ला सर्वोत्कृष्ट कथात्मक चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे, तर ‘भंगार’ ला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपट आणि ‘राम-नामी’ ला सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून निवडण्यात आले आहे. अभिनय श्रेणीमध्ये, ‘ब्रह्मयुगम’ चित्रपटासाठी अभिनेते मामूटी यांची तर, ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी अभिनेते कार्तिक आर्यन यांची ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (मुख्य भूमिका) म्हणून निवड करण्यात आली आहे तर, ‘आर्टिकल 370’ चित्रपटासाठी यामी गौतम यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ (मुख्य भूमिका) हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांची ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधता आणि संपन्नता दर्शवणाऱ्या विविध श्रेणींमध्ये इतर अनेक चित्रपट आणि कलाकारांचाही गौरव करण्यात येणार आहे. ‘कल्की 2898 एडी’, ‘अमरन’, ‘पुष्पा: द रूल पार्ट-02’, ‘भूल भुलैया 3’ आणि ‘स्त्री 2’ यांसारख्या चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

follow us