एडिटर ते डिरेक्टर : निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून दिग्दर्शकीय प्रवास
Nilesh Naik : भावनिक पैलूंना स्पर्श करणारी ‘द्विधा’ची कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभवाची अनुभूती देणार आहे.
Nilesh Naik : संकलक चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याला एकमेकांशी जोडत कथेला आकार देतो आणि हीच दृश्यांची साखळी जोडता-जोडता संपूर्ण चित्रपट दिग्दर्शित करण्याचं स्वप्न दिग्दर्शक निलेश नाईक (Nilesh Naik) यांनी पाहिलं. अनुभव, मेहनत आणि सर्जनशीलतेच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं आहे. एडिटिंगच्या बारकाव्यांपासून दिग्दर्शनाच्या व्यापक कॅनव्हासपर्यंतचा त्यांचा प्रवास ‘द्विधा’च्या (Dvidha) माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
निर्णयांच्या उंबरठ्यावर उभं राहिल्यावर निर्माण होणारी मानसिक घालमेल आणि स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्याची धडपड अशा भावनिक पैलूंना स्पर्श करणारी ‘द्विधा’ची कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभवाची अनुभूती देणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला ‘उत्तम ट्रेलर’ म्हणत अनेकांनी कौतुकाची थाप दिली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत रेणुका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 4 सप्टेंबरला ‘द्विधा’ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
तब्बल 18 वर्षांहून अधिक काळ मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या निलेश नाईक यांनी 2001 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. वरिष्ठ ऑफलाइन एडिटर आणि प्रोमो डायरेक्टर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची स्पिनिंग व्हील प्रॉडक्शन्स ही निर्मिती संस्था सुरू केली. हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. ‘ब्लॅक’, ‘दस’, ‘माय नेम इज खान’, ‘सावरिया’ आणि ‘रा.वन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या प्रमोशनल कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. चित्रपट प्रमोशनसोबतच कॉर्पोरेट फिल्म्स आणि विविध आघाडीच्या ब्रँड्सच्या जाहिरात मोहिमांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.
निलेश नाईक यांच्या सर्जनशील कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय प्रमोशनल कामासाठी त्यांना ‘प्रोमॅक्स एशिया 2004’ आणि ‘प्रोमॅक्स वर्ल्डवाइड 2005’ असे दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या सर्जनशील प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘वो पल दोज लव्हली मोमेंट्स’ हा लघुपट. या लघुपटाने भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार पटकावले आहेत.
एडिटिंगमधून कथेला आकार देण्यापासून ते दिग्दर्शक म्हणून संपूर्ण कथा पडद्यावर उभी करण्यापर्यंतचा निलेश नाईक यांचा प्रवास ‘द्विधा’मधून नव्या वळणावर पोहोचला आहे. दीर्घ अनुभवातून आलेली दृष्टी, सिनेमाच्या भाषेची जाण आणि मानवी भावविश्वाकडे पाहण्याची संवेदनशील नजर यामुळे ‘द्विधा’ चित्रपट त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.