IP अॅड्रेस कॅनडाचा तर, कट अमेरिकेत; सलमानवरील हल्ल्याचा असा होता ‘मास्टर प्लॅन’
Salman Khan House Fireing: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवा खुलासा केला आहे. गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पेजचा आयपी ॲड्रेस (IP address) हा कॅनडाचा (Canada) असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan House Fireing) झाल्यानंतर काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने एका कथित फेसबुक ऑनलाइन पोस्टमध्ये घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि हा ‘ट्रेलर’ असल्याचे सांगून चेतावणी दिली. तपास यंत्रणेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा कट अमेरिकेत रचला गेला होता. सुमारे महिनाभर हे नियोजन सुरू होते.
रविवारी (14 एप्रिल 2024) मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन शूटर्सनी गोळीबार केला होता. यानंतर दोघेही पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, त्यामध्ये विशाल राहुल उर्फ कालूचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
दहावीपर्यंत शिक्षण, अन्… ; सलमानच्या घराखाली फायरिंग करणारा कालू कोण? मोठी माहिती समोर..
कोण आहे विशाल राहुल उर्फ कालू?
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा विशाल राहुल उर्फ कालू हा गुरुग्रामचा रहिवासी असल्याचे पोलिसांच्या डॉजियरमध्ये उघड झाले आहे. कालूने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आणि त्याच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली होती आणि त्याने माफी मागावी अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. याआधीही सलमान खानला जून 2022 मध्ये हस्तलिखित पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती.
पोलीस काय म्हणाले?
वांद्रे पोलिसांनी सांगितले की, भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर दोन जणांनी 4 गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. यानंतर खान यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.