पहिल्याच दिवशीच परीक्षा घेतली अन्… ‘बटवारा 1947’ च्या सेटवरील प्रीती झिंटाचा मजेशीर खुलासा
Batwara 1947 : तब्बल अनेक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारी अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या तिच्या आगामी 'बटवारा 1947' या चित्रपटामुळे
प्रीतीने सांगितले की, राजकुमार संतोषींसोबत काम करण्याची तिची अनेक वर्षांची इच्छा होती. मात्र पहिल्याच दिवशी त्यांनी तिची चांगलीच परीक्षा घेतली. “पहिल्या दिवशी एखादा साधा सीन, चालण्याचा किंवा ओळख करून देणारा शॉट असेल, अशी माझी अपेक्षा होती. एकूणच पहिला दिवस हा तशा अर्थाने रूटीन सेट करण्याच्या दृष्टीने केला जातो, हा शिरस्ता असतो पण इथे माझ्यासमोर तर काहीतर वेगळेच वाढून ठेवलं होतं आणि मला त्याची कल्पनाच नव्हती.
संतोषी सरांनी थेट चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक प्रसंगाचे चित्रीकरण सुरू केले. त्या क्षणी मला अक्षरशः काय करावे, हेच सुचत नव्हते. मी फक्त सनीकडे पाहत होते आणि घाबरले होते,” असे ती हसत म्हणाली.
प्रीतीने आणखी एक मजेशीर अनुभवही सांगितला. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती नुकतीच विमानातून उतरली होती. त्यात तिचे सामानही वेळेवर पोहोचले नव्हते. लगेच लूक टेस्ट झाली. दुसऱ्या दिवशी दोन-तीन वेळा संवादांची तालीम झाली आणि त्यानंतर थेट रात्रभर चित्रीकरण सुरू झाले. “पहिल्याच दिवसापासून आम्ही सलग रात्रभर शूटिंग करत होतो. सुरुवातीला खूप तणाव होता, पण नंतर सर्व काही सहज होत गेले,” असे ती म्हणाली.
या चित्रपटात प्रीती आणि सनी देओल चौथ्यांदा एकत्र झळकणार आहेत. याआधी दोघांनी ‘फर्ज‘ (2001), ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ (2003) आणि ‘भैयाजी सुपरहिट’ (2018) या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘हिरोज’ (2008) मध्येही दोघे होते, मात्र त्यांचे एकत्र सीन नव्हते.