काही लोक काळाला आकार द्यायला अन् समाजाला शिकवायला येतात; विजया मेहतांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Raj Thackeray Vijaya Mehta's passing ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहतांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यावर राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

Raj Thackeray Vijaya Mehta's Passing

Raj Thackeray’s emotional post following Vijaya Mehta’s passing : मराठी रंगभूमीला आधुनिक विचारांची दिशा देणाऱ्या, प्रायोगिक नाटकाला नवे आयाम प्राप्त करून देणाऱ्या आणि अभिनय-दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी नाट्यविश्व, चित्रपटसृष्टी आणि कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त करणारी पोस्ट लिहीली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन झालं. विजयाबाई जवळपास 70 वर्ष तर नक्कीच रंगभूमीवर कार्यरत होत्या. कदाचित गेली काही वर्ष किंवा एखादं दशक असं असेल की त्या कदाचित फारशा सक्रीय नसतील, पण विजयाबाईंसारख्या व्यक्तीच्या असण्याने सुद्धा अनेक माणसं प्रेरणा घेऊन, प्रयोग करत राहतात, त्यामुळे त्यांच्यासारख्यांचं असणं महत्वाचं. जेंव्हा आसपास खुज्यांची खोगीरभरती सुरु आहे असं वाटत असतं तेंव्हा विजयाबाईंसारखी माणसंसुद्धा आहेत हे देखील त्या क्षेत्रातील माणसाला दिलासादायक असतं.

विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब; तर पौड फाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल !

माझी विजयाबाईंच्या बाबतीतील पहिली आठवण 1988 च्या आसपासची. माझ्या आणि शर्मिलाच्या साखरपुड्यात अर्थात माझ्या सासऱ्यांमुळे म्हणजे मोहन वाघांमुळे पहिल्यांदाच विजयाबईंना भेटण्याचा योग आला . त्यानंर अनेकदा गाठीभेटी झाल्या. मला त्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न पडला की या मेहता इतक्या सुंदर मराठी कसं काय बोलतात आणि त्यात मराठी रंगभूमीसाठी एवढं काम का करतात ? मग समजलं की मूळच्या विजया जयवंत ! मराठी कुटुंबात जन्मलेल्या ! अर्थात रंगभूमीच्या बाहेरच्या लोकांना अजूनही बऱ्याचदा हा प्रश्न पडतो ! असो.

स्पायडर-मॅन : ब्रँड न्यु डे हा ‘ईपिक’ स्वरूपात सादर होणारा पहिला हॉलिवूड चित्रपट

माझे मराठी रंगभूमीवर काम करणारे अनेक कलाकार हे परिचयाचे आहेत , अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्याबद्दल चर्चा होत असते परंतु जेव्हा कधी विजयाबाईंचं नाव येतं तेव्हा ते सर्व आपापले कान पकडतात ! मी नेहमी सांगत असतो की मला नाटक हा कलाविष्कार कधी समजलाच नाही , म्हणजे त्याची मांडणी ! माझ्या मते नाटक हा विषय चित्रपट , वेब सिरीज , सिरियल किंवा अजून काही असेल यापेक्षा प्रचंड कठीण आहे ! आणि त्यात विजयाबाईंबद्दल ही सर्व मंडळी जेव्हा भरभरून बोलतात तेव्हा समजतं की या बाई देखील त्याहून समजण्या पलीकडे आहेत !

केतन अग्रवाल हत्याकांडावरील वक्तव्य भोवलं; खिल्ली उडवणाऱ्या महिला डेंटिस्टचं 5 वर्षांसाठी निलंबन

एखादा माणूस काळाला आकार देतो, का काळ त्या माणसाला घडवतं? याचं उत्तर या दोहोंचा संगम जिथे घडतो तिथे काहीतरी सज्जड घडतं.
मराठी रंगभूमीच्या बाबतीत घडलं ते विजयाबाई, विजय तेंडुलकर असतील, डॉ. श्रीराम लागू असतील किंवा त्यांच्यासारख्या इतरांच्या रूपाने. या सगळ्यांना आसपासचा काळ कसा बदलतोय, जग कसं बदलतंय याचं अचूक भान होतं. त्या जगाकडे बघण्याची हिंमत होती. इथे हिंमत होती अशा अर्थाने म्हणतोय की आपल्या जगापेक्षा खरंच काहीतरी वेगळं, मोठं बाहेर सुरु आहे हे बघणं, ते मान्य करणं. आणि आपल्या जगात असलं काही नाही हे मान्य करणं आणि त्यातून काहीतरी आपल्या अस्सल भारतीय, मराठी जाणिवांना साजेसं निर्माण करणं, याला एक वेगळी शक्ती लागते. ती शक्ती त्या काळात अनेकांच्यात होती. ती विजयाबाईंच्यात पण होती.

रंगायन’ नाट्यसंस्थेच्या त्या प्रमुख संस्थापक. ‘रंगायन’ने प्रायोगिक रंगभूमीला आकार दिला. १९६० च्या दशकांत जेंव्हा रंगायनची स्थापना झाली, तेंव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेंव्हा प्रबोधन आणि सामाजिक सुधारणा याच्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात, औद्योगिक पाया रचला जात होता.यंत्रयुगाशी आणि त्या यंत्रयुगाचा उगम ज्या जगात झाला त्या जगाशी मराठी माणसाची तोंडओळख व्हायला लागली होती. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला सुरुवात झाली होती. साहित्यात प्रयोग होत होते.

नेमाडेंचं “कोसला” ज्याने मराठी साहित्यात खळबळ उडवली ते त्याच काळातलं. त्यामुळे मराठी रंगभूमी म्हणजे भव्य सेट्स, मेलोड्रामा याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं नाटक असावं, त्याने किती तिकिटं विकली गेली याची चिंता करू नये, त्याने खऱ्या अर्थाने प्रायोगिक व्हावं याची गरज निर्माण झाली. आणि ती पोकळी विजयाबाईंनी भरून काढली. मराठी सिनेमा बदलायला तयार नसल्यामुळे मोठ्या अपेक्षेने तेंव्हाचा तरुण रंगभूमीकडे अपेक्षेने बघत होता आणि ती अपेक्षा विजयाबाईंनी पूर्ण केली.

विजयाबाईंना कुठेतरी, अस्तंगतला काय चाललं आहे, किंवा गेल्यात जमा आहे याचं एक सुप्त आकर्षण पण होतं आणि भान पण असावं. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची संख्या मोठी, त्यांनी अभिनय केलेली नाटकं पण अनेक. पण त्यांनी दिग्दर्शित केलेली आणि रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली नाटकं म्हणजे हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष, संध्याछाया, वाडा चिरेबंदी.

बॅरिस्टरमधल्या परदेशात शिकून आलेल्या, नव्या विचारांची झुळूक अनुभवलेल्या नायकाला खटकणाऱ्या रूढी परंपराशी सुरु असलेला त्याचा वाद. ‘पुरुष’ मध्ये पितृसत्ताक व्यवस्थेने जन्माला घातलेल्या सत्ता, हुकूमत या कल्पनांना दिलेलं आव्हान. किंवा वाडा चिरेबंदी मधील जुनी शब्दशः ओसाड गावची सत्ता राहिलेली जमीनदारी नष्ट होण्याच्या काळात, कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा टाकून, नव्याने स्वतःला सिद्ध करणं यात दोन पिढ्यांच्यातील सुरु असलेला संघर्ष असो. हा संघर्ष विजयाबाईंनी अचूक उभा केला. हे करताना विजयाबाईंनी कोणाला नायक ठरवलं नाही की कोणाला खलनायक. जो तो आपल्या जागी योग्य. मी वर म्हटलं तसं काळ कुठे बदलतोय याचं अचूक भान आणि त्यावरच नाटकातून प्रकटीकरण (expression ) ही फक्त मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीला विजयाबाईंनी दिलेली देणगी.

विजयाबाईनी पुढे जाऊन सिनेमा केला. जागतिक रंगभूमीवर काय सुरु आहे हे बघून त्यांनी त्याला मराठी साजात सादर केला, पण या सगळ्यातून त्यांनी मराठी थिएटरमध्ये एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजून घ्यावं हे इथे किमान २ पिढ्यात रुजवलं. त्यामुळे मराठी नट हे हिंदीत किंवा इतर भाषांत गेल्यावर सहज काम करतात असा अभिप्राय आपण ऐकतो त्याचं मोठं श्रेय विजयाबाईंना जातं. बरेचसे लोक आपण कोण आहोत हे दाखवायला येतात पण काही जणं हे त्या समाजाला शिकवायला येतात . त्यापैकी विजयाबाई ह्या होत्या ! काल विजयाबाई गेल्या. अशी पिढीच्या पिढी घडवणारी व्यक्ती परत कुठून मिळणार हा प्रश्न आहे. अर्थात जर काळाची गरज असेल तर ती निर्माण होते अन्यथा नाही. पण तोपर्यंत विजयाबाईंसारखी व्यक्ती होती, आणि मापदंड काय असतो हे किमान महाराष्ट्राला, इथल्या कलाकारांना विजयाबाईंच्या रूपाने कळेल. विजयाबाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

follow us