रामायणमध्ये लक्ष्मणाची भूमिका मिळण्याबाबत रवि दुबे चा अद्भुत संयोग; “एका वर्षानंतर, त्याच मंदिरात दर्शन अन्…
Ravi Dubey : रामायणसारख्या भव्य चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका मिळण्याच्या आधी घडलेला एक विलक्षण योगायोग अभिनेता रवि दुबे यांनी अलीकडेच
Ravi Dubey : रामायणसारख्या भव्य चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका मिळण्याच्या आधी घडलेला एक विलक्षण योगायोग अभिनेता रवि दुबे यांनी अलीकडेच शेअर केला. त्यांनी सांगितले की कास्टिंग होण्याच्या साधारण एक वर्ष आधी ते लखनौमध्ये शूटिंगदरम्यान लक्ष्मण मंदिरात गेले होते आणि वर्षभरानंतर त्यांनाच लक्ष्मणाची भूमिका मिळाली. रवि दुबे हे भारतीय मनोरंजन विश्वातील बहुप्रतिभावान कलाकार म्हणून ओळखले जातात. अभिनेता म्हणून त्यांनी आपली ठसठशीत ओळख निर्माण केली असून, आपल्या ‘ड्रीमियाटा एंटरटेनमेंट’ या बॅनरद्वारे यशस्वी निर्माता म्हणूनही त्यांनी वेगळं स्थान मिळवलं आहे.
आता ते दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ या चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या पौराणिक कथानकात त्यांच्यासोबत रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रवि यांनी सांगितले की, “चित्रपटासाठी लॉक होण्याच्या सुमारे वर्षभर आधी मी लखनौमध्ये शूट करत होतो. आम्ही गुरिल्ला शूट करत होतो. मी बाईक चालवत होतो आणि माझी हिरोईन मागे बसली होती. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यावर आम्ही बाईक बाजूला लावली आणि पुढच्या सूचनांची वाट पाहत थांबलो. तेव्हा मागे वळून पाहिलं तर तिथे लक्ष्मणजींचं मंदिर होतं.” ते पुढे म्हणाले, “मला आधी कधीच माहीत नव्हतं की तिथे असं मंदिर आहे. तेव्हा लक्षात आलं की लखनौला पूर्वी ‘लक्ष्मणपुरी’ म्हटलं जायचं. कथेनुसार, भगवान श्रीरामांनी लक्ष्मणांना हे स्थान दिलं होतं. मला मंदिरात जावंसं वाटलं. मी आत जाऊन राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या त्रिमूर्तीचं दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि त्या क्षणाचा फोटोही काढला.” विशेष म्हणजे, त्या वेळी ते ज्या शोचं शूटिंग करत होते त्यातील त्यांच्या पात्राचं नाव ‘लखन’ होतं. त्या शोचं नाव ‘लखन लीला भार्गव’ होतं.
रवि म्हणाले, “हे सगळे अद्भुत योगायोग होते. आणि जेव्हा मला चित्रपटासाठी लॉक करण्यात आलं, तेव्हा तीच मंदिरातील फोटो माझ्या डोळ्यांसमोर आली. मला जाणवलं की मी ही घटना पूर्णपणे विसरलो होतो. नेमकं जवळपास एक वर्षानंतर, त्याच मंदिराच्या दर्शनानंतर मला लक्ष्मणाची भूमिका मिळाली.”
आमदार रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले, अजित पवार प्रकरणात केली ‘ही’ मोठी मागणी
नमीत मल्होत्रा यांच्या ‘प्राईम फोकस स्टुडिओ’च्या निर्मितीत, तसेच ८ वेळा ऑस्कर विजेत्या DNEG आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन यांच्या सहकार्याने साकारत असलेला हा दोन भागांतील भव्य चित्रपट आयमॅक्समध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण’चा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आता रवि दुबे यांना मोठ्या पडद्यावर शूर, निष्ठावान आणि सामर्थ्यवान लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
