‘मी पहिल्यांदा स्पायडर-मॅन पाहिला तेव्हा…’; ‘ब्रँड न्यू डे’च्या प्रदर्शनापूर्वी ऋषभ शेट्टीने व्यक्त केले सुपरहिरोवरील प्रेम
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मार्व्हलच्या या लोकप्रिय सुपरहिरोला समर्पित एका विशेष व्हिडीओमध्ये ऋषभ शेट्टी झळकले आहेत.
Rishab Shetty expresses his love for superheroes : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी आपण लहानपणापासून स्पायडर-मॅनचे चाहते असल्याचे सांगितले आहे. स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मार्व्हलच्या या लोकप्रिय सुपरहिरोला समर्पित एका विशेष व्हिडीओमध्ये ऋषभ शेट्टी झळकले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांची स्पायडर-मॅनशी अनपेक्षित भेट होताना दिसते, त्यानंतर त्यांनी या सुपरहिरोबद्दलचे आपले प्रेम आणि आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.
कांतारा चित्रपटामुळे देशभरात लोकप्रियता मिळवणारे ऋषभ शेट्टी आज भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक मानले जातात. अशा वेळी त्यांनी चाहत्याच्या भूमिकेतून स्पायडर-मॅनबद्दल व्यक्त केलेल्या भावना अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी आलेला हा व्हिडीओ भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय स्टार आणि जगातील सर्वाधिक आवडत्या सुपरहिरोंपैकी एक असलेल्या स्पायडर-मॅन यांचा खास संगम ठरत आहे.
स्पायडर-मॅनवरील प्रेमाबद्दल बोलताना ऋषभ शेट्टी म्हणाले, “मला आजही आठवतं, अनेक वर्षांपूर्वी मी एका सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये पहिल्यांदा स्पायडर-मॅन पाहिला होता. त्याच क्षणी माझं पीटर पार्करशी नातं जुळलं. तो नेहमीच मला आठवण करून देतो की आयुष्यात कधी ठेच लागली, चुका झाल्या किंवा मन तुटलं तरी हरकत नाही, फक्त आपल्या मनातील चांगुलपणा हरवू देऊ नये.”
परीक्षा, स्पर्धा आणि नैराश्याचा विळखा; 10 वर्षांत 80 टक्क्यांनी वाढलेल्या विद्यार्थी आत्महत्यांनी वाढवली चिंता
ते पुढे म्हणाले, “स्पायडर-मॅन आपल्याला हेही शिकवतो की मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. हा संदेश कोणत्याही वयात तितकाच महत्त्वाचा असतो. वर्षानुवर्षे स्पायडर-मॅनबद्दलचे माझे प्रेम अधिकच वाढत गेले आहे. आज तो माझ्या मुलांसाठीही तितकाच खास आहे. खरं तर, स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे पाहण्यासाठी त्यांनी आधीच माझ्याकडून तिकिटे बुक करून घेतली आहेत, जेणेकरून आम्ही सर्वजण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एकत्र पाहू शकू.”
मार्व्हल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे हा चित्रपट 30 जुलै रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. टॉम हॉलंड मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
स्पायडर-मॅनच्या नव्या साहसाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी ऋषभ शेट्टीचा हा खास संदेश आणि त्यांचा उत्साह चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवणारा ठरत आहे.