चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर! चंद्रकांत कुलकर्णींच्या नाटकातून पुनरागमन

Sachin Khedekar returns to stage after 21 years from Chandrakant Kulkarni’s play : ‘गेट वेल SOON!’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’, ‘संज्या छाया’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘चारचौघी’, ‘आज्जी बाई जोरात’ आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे. आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक ‘भूमिका’ येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते… असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ CM फडणवीसांनी केलं चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण
चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. अभिनेते सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून, सोबत हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. सचिन खेडेकर यांसोबतच समिधा गुरू, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर यांच्याही दमदार भूमिका या नाटकात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
क्षितीज पटवर्धन यांनी ‘भूमिका’ नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ नाटकाचा शुभारंभ २८ मार्चला होणार आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अशोक पत्की यांचे आहे. प्रकाशयोजना अमोघ फडके तर रंगभूषेची जबाबदारी उलेश खंदारे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके तर निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर आहेत.