सखा माझा पांडुरंगमध्ये सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी
मालिकेत सुरु होणार भक्तीचं महापर्व, येत्या 29 मार्च रविवार दु. 1:00 आणि सायं. 7:30 वाजता जलसमाधी विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
Saint Sakhubai will take water burial : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला मिळणार आहे. सखु दिगूचे प्राण वाचवते, पण या घटनेचे श्रेय झिंग्रोबाला द्यावे म्हणून मनोरमा आणि नागोजी एक मोठे कारस्थान रचतात. सखुला अंधारात ठेवून झिंग्रोबाच्या पूजेची तयारी केली जाते, मात्र सत्य समजल्यावर सखु ठामपणे नकार देत सर्वांसमोर विठुरायावरचा तिचा अढळ विश्वास व्यक्त करते.
यामुळे संतापलेला नागोजी गावकऱ्यांमध्ये भीती पसरवतो आणि झिंग्रोबाचा कोप दाखवत सखुवर अमानुष अत्याचार करतो. तरीही सखु कोणत्याही परिस्थितीत विठोबाची भक्ती सोडायला तयार होत नाही. तिची ही न डगमगणारी श्रद्धा पाहूनही नागोजी थांबत नाही आणि अखेर सखुला तिच्या लाडक्या विठोबाच्या मूर्तीसह तळ्यात बुडवण्याचा निर्णय घेतो. या जलसमाधीच्या प्रसंगात सखु आपल्या विठुरायाला कवटाळत मृत्यूला सामोरी जाते.
आता विठुराया सखूला या प्रसंगातून कशाप्रकारे बाहेर काढेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. मालिकेत सुरु होणार भक्तीचं महापर्व, येत्या 29 मार्च रविवार दु. 1:00 आणि सायं. 7:30 वाजता जलसमाधी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. संत सखुबाई यांची भूमिका साकारणारी बालकलाकार स्वराली खोमणे या प्रसंगाबद्दल म्हणाली की, “संत सखूबाईंची भूमिका साकारत असल्यापासून मला खूप सकारत्मकता जाणवते.
नुकतंच मला दोरखंड लावून वर लटकवलं होतं. याचबरोबर जलसमाधीचा सीन शूट झाला. जेव्हा पण असे प्रसंग असतात तेव्हा मला भीती वाटते पण एकदा कॅमेरा रोल झाला की संत सखूबाईंसारखी हिम्मत माझ्यात येते. या आठवड्यात संत सखूबाईची कठोर परीक्षा घेतली जाणार आहे त्यातही विठुराया त्यांना कशी मदत करेल हे पाहायला सगळेच उत्सुक आहेत. खरंतर मी हे पात्र साकारू शकते कारण माझे आई बाबा, मालिकेची टीम मला खूप सांभाळते, माझी काळजी घेते. आता माझ्या परीक्षा सुरु आहेत. अभ्यास सांभाळून मालिकेत मुख्य भूमिका साकारणं खूप कठीण आहे पण मालिकेच्या टीमचा पाठिंबा असल्यामुळे हे सगळं शक्य होतं.”