मला झोडा, बडवा, ठोका; पण प्रश्नाचं उत्तर द्या; संजीव मोने यांच्या पोस्टने रंगभूमी विश्वात खळबळ
मराठी रंगभूमीतील तथाकथित सांस्कृतिक माफियावर निशाणा साधत, काही नाटककारांना उगाचच महान ठरवले जात असल्याचा आरोप केला आहे.
Sanjeev Mone’s post creates a stir in the theatre world : मराठी रंगभूमीतील काही नावाजलेल्या नाटककारांवर अभिनेते संजीव मोने यांनी अत्यंत परखड शब्दांत टीका केली आहे. सामाजिक माध्यमांवर केलेल्या एका पोस्टमधून त्यांनी मराठी रंगभूमीतील तथाकथित सांस्कृतिक माफियावर निशाणा साधत, काही नाटककारांना उगाचच महान ठरवले जात असल्याचा आरोप केला आहे. संजीव मोने यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, मराठी रंगभूमीवर असे किती नाटककार आहेत ज्यांच्या नाटकांचे प्रयोग कधीच 200 च्या पुढे गेले नाहीत, मात्र तरीही त्यांना महान नाटककार म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता त्यांच्या कलाकृतींच्या लोकप्रियतेमुळे नसून एका विशिष्ट सांस्कृतिक गटाच्या पाठबळामुळे मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
मोने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एखादे नाटक रंगमंचावर आले की त्याच्याशी संबंधित लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांची एकच अपेक्षा असते, ती म्हणजे त्या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा आणि कलाकृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी. मात्र काही नाटकांच्या बाबतीत तसे होत नसल्याचे ते म्हणाले. त्यांच्या मते, काही नाटकांना नैसर्गिक लोकप्रियता मिळत नसतानाही त्यांना कृत्रिमरित्या मोठे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी त्यांनी एक बोचरी उपमा दिली. जसे पावडर टाकून आंबे पिकवतात, तसे काही नाटकं सांस्कृतिक पातळीवर पिकवली जातात, असे म्हणत त्यांनी अशा कलाकृतींना मिळणाऱ्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मी तीन दिवस झोपलो नाही, पण लोकांसाठी निर्णय घेतला, सचिन अहिर यांची भावनिक कबुली
मराठी रंगभूमीतील काही मंडळी केवळ मर्यादित प्रेक्षकांसमोर वाहवा मिळवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. 150 ते 175 प्रेक्षकांसमोर वाहवा घेणाऱ्यांपेक्षा हजार प्रेक्षकांसमोर शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोहोचेल अशा नाटकात काम करून दाखवा, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. आपल्या भूमिकेवर टीका होईल, विरोध होईल याची जाणीव असूनही आपण हे मत मांडत असल्याचे मोने यांनी स्पष्ट केले. मला झोडा, बडवा, ठोका, पिटून काढा; मला त्याची मजा येणार आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे संकेत दिले.
संजीव मोने यांच्या या वक्तव्यामुळे मराठी रंगभूमीतील कलात्मकता विरुद्ध लोकप्रियता, समीक्षकांची मान्यता विरुद्ध प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि तथाकथित सांस्कृतिक वर्चस्व या विषयांवर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानानंतर रंगभूमी क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे आता लक्ष लागले आहे.