नात्यांच्या भावविश्वाची गोष्ट, हसत खेळत उलगडणार ‘आदि अनंत’ ! जेजुरीत खंडोबाचा आशीर्वाद घेत पोस्टरचे अनावरण!
Aadi Anant : पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं.
Aadi Anant : काही नाती आपल्याला नशिबाने मिळतात, तर काही आपण कमावतो … नात्यांमधल्या प्रेमाची, सहवासाची, आणि भावनांची गोष्टं हसत खेळत , धमाल करत सांगणाऱ्या ‘आदि अनंत’ या (Aadi Anant) आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले.
जेजुरी येथे श्री खंडोबाचे आशीर्वाद घेत पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं. एका व्यक्तीच्या कुशीत दुसऱ्याने विसावलेलं हे दृश्य परस्परांवरील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची जाणीव करून देतं.
त्यामुळे ‘आदि अनंत’ नेमक्या कोणत्या नात्याची गोष्टं सांगणार, याची उत्सुकता पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे. ह्या दोघांची जोडगोळी असल्यामुळे धमाल ही असेल हे काही वेगळं सांगायला नको …
या चित्रपटात अशोक सराफ व संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर असे दमदार कलाकार पाहायला मिळणार आहे.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसं जवळ असूनही त्यांच्यातलं भावनिक अंतर वाढतंय. अशा वेळी आपल्या माणसांचा सहवास, त्यांचं प्रेम आणि त्यांचं सहवास किती महत्वाचा आहे, याभोवती ‘आदि अनंत’ची कथा गुंफली असल्याचा अंदाज पोस्टरवरून येतो. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या रूपात दिसणाऱ्या नात्यांची ऊब आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आठवणी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं जाणवतं.
दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही सांगितलं जातं. एखाद्या नात्याची किंमत त्यातल्या मोठ्या प्रसंगांपेक्षा छोट्या-छोट्या क्षणांत जाणवते. ‘आदि अनंत’ करताना मला याच भावविश्वाला पडद्यावर मोकळेपणाने जगवायचं होतं. प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी कुठेतरी स्वतःला जोडावं, हा या चित्रपटामागचा माझा प्रयत्न आहे.”
समीर हंपी व अनिकेत मराठे म्हणतात, “आदि अनंत” ही प्रत्येकाच्या घरात , प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्टं आहे … हा सिनेमा पाहिल्यावर प्रत्येकाला आपल्या घरातल्या , आपल्या माणसांची आठवण येईल ह्याची आम्हाला खात्री आहे …
लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे निर्मित, रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. येत्या 12 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.