Sanya Malhotra : स्त्रीवाद हा फक्त महिलांसाठी नाही, तो पुरुषांसाठीही

Sanya Malhotra : अभिनेत्री सान्या मल्होत्राने दशकापूर्वी “दंगल” या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली पुढे जाऊन

Sanya Malhotra

Sanya Malhotra : अभिनेत्री सान्या मल्होत्राने दशकापूर्वी “दंगल” या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली पुढे जाऊन १० वर्षांत सान्याने चित्रपट ओटीटी विश्वात एक प्रभावी अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख संपादन केली. तिच्या भूमिका निवडण्याची पद्धत जी कधीही बाह्य दबावांमुळे प्रभावित झाली नाही. दमदार अभिनय करणे ही एक गोष्ट आहे, पण पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या उद्योगात सान्याची ठाम भूमिका तिला प्रेरणादायी बनवते. तिच्या चित्रपटांमधून महिलांना सक्षम आणि ताकदवान स्वरूपात कश्या मांडते हे कौतुकास्पद आहे. सान्या मल्होत्राने अलीकडेच सांगितल की “Mrs “सारख्या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटांद्वारे महिलांना सक्षम करणे हा तिचा उद्देश आहे. लिली सिंगसोबतच्या पॉडकास्ट मध्ये सान्या मल्होत्राने स्त्रीवादाबद्दलची तिची भूमिका स्पष्ट केली आणि तो केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही असल्याचे सांगितले.

लिली सिंगच्या Shame-Less या पॉडकास्टमध्ये सान्या मल्होत्रा म्हणाली, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी खूप मेहनत करते आणि आज मी माझ्या स्वप्नातील आयुष्य जगत आहे. मला नेहमीच अभिनेत्री व्हायचे होत. मला मिळणाऱ्या संधींसाठी आणि पडद्यावर साकारायला मिळणाऱ्या अप्रतिम व्यक्तिरेखांसाठी मी खूप कृतज्ञ आहे. अभिनेत्री म्हणून माझ्या व्यासपीठाचा योग्य प्रकारे उपयोग करत असल्याचा मला आनंद आहे. मला फक्त महिलांना योग्य पद्धतीने साकारायचे आहे”

“मला अशा व्यक्तिरेखा साकारायला खूप आवडतात. मी Mrs. केली आहे. माझी सुरुवात दंगल पासून झाली आणि माझी जडणघडण तशीच झाली आहे. मला महिलांना सक्षम करायचे आहे. मला स्वतःलाही सक्षम बनवायचे आहे आणि आत्मविश्वासाने जगायचे आहे”

तिच्यातील स्त्रीवादी विचार कसे विकसित झाले याबद्दल बोलताना सान्या म्हणाली “मी आधी स्त्रीवादी नव्हते. खरं तर, त्याचा नेमका अर्थही मला माहीत नव्हता. मी मुंबईला आले, अधिक वाचू लागले आणि मला जाणवले की महिलांमध्ये सहानुभूतीची कमतरता आहे. लोकांना आम्ही मैत्री करावी असे वाटत नाही, आम्ही कोणत्याही गोष्टीवर नेतृत्व करावे असे वाटत नाही. त्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या शक्तीबद्दल, आत्मविश्वासाबद्दल आणि आम्ही काय करू शकतो याबद्दल अनभिज्ञ राहावे असे वाटते. हळूहळू मला जाणवू लागले की पितृसत्ताक व्यवस्था माझ्या कुटुंबातील महिलांमध्ये, मैत्रिणींमध्ये अस्तित्वात आहे. सोशल मीडिया माझ्यासाठी खूप मोठा डोळे उघडणारा अनुभव ठरला. माझ्या कारकिर्दीसोबतही हा बदल घडला. लहानपणी पडद्यावर असे आदर्श माझ्यासमोर नव्हते. महिलांची सहजपणे जागा बदलली जात असे आणि अभिनेत्रींसाठी पडद्यावर फारशा अर्थपूर्ण भूमिका नव्हत्या”

ती पुढे म्हणाली “स्त्रीवाद हा फक्त महिलांसाठी नाही, तो पुरुषांसाठीही आहे. जेव्हा त्यांना जाणवते की पितृसत्ताक व्यवस्था त्यांनाही त्यांच्या अनेक भावना दडपायला भाग पाडते किंवा त्यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आणते, तेव्हा त्यांना समजते की पितृसत्ताक व्यवस्थेचा परिणाम काय असतो. हे फक्त महिलांनाच समजते असे नाही.”

सान्या मल्होत्राने “Mrs” या चित्रपटाचा तिच्यावर झालेला परिणामही सांगितला. ती म्हणाली, “जेव्हा मी Mrs केला, तेव्हा मी अनेक महिलांना भेटले आणि त्यांची मुलाखत घेतली. अनेक महिलांनी माझ्याशी संपर्क साधला. त्या चित्रपटाचा मला खूप अभिमान आहे आणि इतक्या लोकांनी तो पाहिला आणि आवडला याचा मला आनंद आहे. मी महिलांना भेटते आणि त्या म्हणतात की ही त्यांचीच कहाणी आहे. हे ऐकून मला दुःखही होते आणि रागही येतो. मला माहीत आहे की माझे चित्रपट चांगल्या चर्चांना सुरुवात करतात. जरी फक्त १ टक्के बदल झाला तरी मी त्यात आनंदी आहे. आपण महिलांना आई म्हणून एका उंच स्थानावर ठेवतो, त्यांच्याकडून सतत त्यागाची अपेक्षा करतो आणि अनेकदा त्याची दखलही घेत नाही. माझ्या आईला फॅशन डिझायनर व्हायचे होते, पण तिला ते शक्य झाले नाही.”

मोठ्या पडद्यावर सशक्त महिला व्यक्तिरेखांची धुरा वाहणाऱ्या सान्या मल्होत्राने आपल्या अभिनयाची व्यापकता सिद्ध केली असून ती शेवटची बंदर मध्ये दिसली होती आणि आता ती आगामी “ सुंदर पूनम “ चित्रपटात ती पुन्हा एकदा नवखी भूमिका साकारणार आहे.

follow us