Satyabhama चित्रपटाचा मनाला भिडणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Satyabhama : नेहमीच रुपेरी पडद्यावरील कलाकृतींच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कलाकृती रसिकांना केवळ भूतकाळात नेत नाहीत, तर त्या काळातील वास्तवतेचे दर्शनही घडवतात. बऱ्याचदा त्या काळातील काही चांगल्या-वाईट घटना वर्तमानातील जीवन सुखकर बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. काही मात्र मनाला चटका लावून जातात. पूर्वीची सती प्रथा आज बंद झाली तरी ती पडद्यावर पाहताना मनाची घालमेल झाल्याशिवाय राहात नाही. याच प्रथेवर आधारलेला ‘सत्यभामा’ हा मराठी चित्रपट 8 ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये दिसणारी ‘सत्यभामा’ची लक्षवेधी झलक उत्सुकता वाढवणारी आहे.
श्री साई सृष्टी फिल्म्स एलएलपी प्रस्तुत ‘सत्यभामा’ या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे, सारंग मनोज, अंकुर सचदेव आणि वीरल दवे यांनी केली आहे. ‘सत्यभामा’चे दिग्दर्शन सारंग मनोज आणि अभिजीत झाडगावकर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन मनीषा पेखळे यांनी केले आहे. हिरवागार निसर्ग, प्राचीन मंदिर आणि बासरीच्या सुमधूर सूरांनी ट्रेलर सुरू होतो. प्रियकर-प्रेयेसीच्या प्रेमकथेसोबतच यात भाऊ-बहिणीच्याही प्रेमाची गोष्टही आहे. सतीच्या प्रथेत कित्येक निरपराध स्त्रीयांचा बळी जात असल्याचे पाहून नायकाचे मन उद्वीग्न होते आणि त्याला जीवनाचा उद्देश सापडतो. चित्रपटाचा नायक सती प्रथेविरोधात लढा देण्यासाठी जणू क्रांतीची मशाल पेटवतो. त्याच्या संघर्षाची अनोखी कहाणी म्हणजेच ‘सत्यभामा’ हा चित्रपट आहे. ‘सत्यभामा’चा ट्रेलर खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखविणारा आहे. या चित्रपटाने ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, स्वीडन फिल्म फेस्टिव्हल, जागरण फिल्म फेस्टिव्हल, बर्लिन लिफ्ट-ऑफ फिल्म फेस्टिव्हल अशा देश-विदेशांतील मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्येही हजेरी लावली आहे.
थेट मनाला भिडणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. याबाबत ते म्हणाले की, हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ स्वातंत्र्यपूर्व काळात नेणार नसून, त्या काळातील वातावरण आणि विचारसरणीचेही दर्शन घडविणारा आहे. आज आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. स्त्रियांनाही जगण्याचा समान अधिकार आहे, पण त्या काळातील स्त्रीयांनी जे भोगले ते शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असे ‘सत्यभामा’ पाहिल्यावर रसिकांना वाटेल. हा केवळ एक चित्रपट नसून, एक विचार आहे, जो सर्वदूर पोहोचण्याची गरज आहे. कारण आजही रूढी-परंपरांच्या नावाखाली देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे एक स्ट्राँग संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नांदणी ग्रामस्थ भावूक, न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणी वनताराकडे रवाना
‘सत्यभामा’मध्ये माधव अभ्यंकर, अभिजीत आमकर, भाविका निकम, सृष्टी मालवंडे, ज्योती पाटील, सारंग मनोज, ज्ञानेश्वर शिंदे, मुकुंद कुलकर्णी, दिपाली व योगेश कंठाळे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. याखेरीज ऋषिका सूर्यवंशी, अर्नव शिंदे, लोकेश देवकर, अर्नव तेलंग आदी बालकलाकारांचा अभिनयही लक्ष वेधणार आहे. मनीषा पेखळे यांनी गीते लिहिली असून संगीतकार निखिल महामुनी यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. हनी सातमकर यांनी पार्श्वसंगीत दिले असून, कोरिओग्राफी नरेंद्र पंडीत यांची आहे. कला दिग्दर्शन सचिन एच. पाटील यांनी केले असून, सिनेमॅटोग्राफी डिओपी जितेंद्र रामचंद्र आचरेकर यांनी केली आहे. सुमीत ओझा यांनी व्हीएफएक्स केले असून, संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. मेकअप नितीन दांडेकर यांनी, तर कॉस्च्युम डिझायनिंगसह स्टाईल शीतल लीना लहू पावसकर यांनी केली आहे. फाईट मास्टर मोहित सैनी यांनी दिग्दर्शित केलेली साहसदृश्ये खिळवून ठेवणार आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन कंट्रोलर अकबर शेख असून, कास्टिंग समन्वयक कुंडलिक कचले आहेत.