‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित; 8 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित; 8 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Satyabhama : ‘सत्यभामा – अ फरगॅाटन सागा’ (Satyabhama – A Forgotten Saga) या मराठी चित्रपटात रसिकांना आपल्या समाजाच्या भूतकाळातील विचारसरणीचे दर्शन घडविणार आहे. एकोणिसाव्या शतकातील सती प्रथेवर आधारलेला ‘सत्यभामा’ हा चित्रपट त्या काळातील वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकणारा आहे. मुलांवर आई-वडिलांचं असो, वा आई-वडिलांवर मुलांचं, भावावर बहिणचं असो, वा बहिणीवर भावाचं, प्रेयेसीवर प्रियकराचं असो, वा प्रियकरावर प्रेयेसीचं… अपेक्षा न ठेवता केलं जातं तेच खरं प्रेम… अशाच प्रेमाची अनुभूती देणारा सती प्रथेवर आधारित एकोणिसाव्या शतकातील पार्श्वभूमी असलेला ‘सत्यभामा – अ फरगॅाटन सागा’ हा आशयप्रधान चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 8 ऑगस्टला झळकणार आहे.

या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्री साई सृष्टी फिल्म्स एलएलपी (Shri Sai Srishti Films LLP) प्रस्तुत ‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे (Manisha Pekhale) , सारंग मनोज, अंकुर सचदेव आणि वीरल दवे यांनी केली आहे. सारंग मनोज आणि अभिजीत झाडगावकर या दिग्दर्शक द्वयींनी ‘सत्यभामा’चे दिग्दर्शन केले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचे झालेले दमन आणि त्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या भावाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे संकेत ‘सत्यभामा’चा टिझर पाहिल्यावर मिळतात.

टिझरच्या सुरुवातीला हिरवा शालू घेऊन नटलेला निसर्ग सम्मोहित करते. धुक्याची पांढरी शाल पांघरून उगवलेल्या रम्य सकाळच्या वेळी नायकाने नायिकेचा हात हातात घेतला आहे. शंकराचे पवित्र मंदिर आणि धाकट्या भावाच्या हातावर राखी बांधणारी बहिणही टिझरमध्ये आहे. या सर्वांची सांगड एकोणिसाव्या शतकातील अमानुष सती प्रथेशी घालण्यात आली असल्याचे टिझर पाहिल्यावर समजते. ‘एक असहाय्य स्त्री समाजाशी एकटी कशी लढू शकेल’ आणि ‘मला माझ्या जीवनाचे उद्देश सापडले असून, मी सती प्रथेविरोधात लढा देणार’, हे संवाद ‘सत्यभामा’ चित्रपटाचे सार सांगणारे आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भावा-बहिणीचे अतूट आणि निस्वार्थ नाते अधोरेखित केले जाणार आहे. 9 ऑगस्टला रक्षाबंधन असून, त्याच्या आदल्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘सत्यभामा’च्या रूपात जगभरातील तमाम भावा-बहिणींना एक कलात्मक प्रेमळ भेटच मिळणार असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. हा चित्रपट केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याची गोष्ट सांगणारा नसून, समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकत डोळ्यांत अंजन घालणाराही आहे. इतिहासात दडलेली एक जळजळीत सत्य ‘सत्यभामा’च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर येणार असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन ‘सत्यभामा’ जरूर पाहावा, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे. ‘सत्यभामा’ची कथा, पटकथा आणि संवादलेखन मनीषा पेखळे यांनी केले आहे.

या चित्रपटात माधव अभ्यंकर, अभिजीत आमकर, भाविका निकम, सृष्टी मालवंडे, ज्योती पाटील, सारंग मनोज, ज्ञानेश्वर शिंदे, मुकुंद कुलकर्णी, दिपाली व योगेश कंठाळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत तर ऋषिका सूर्यवंशी, अर्नव शिंदे, लोकेश देवकर, अर्नव तेलंग आदी बालकलाकार ही दिसणार आहेत. या चित्रपटातील गीतरचना मनीषा पेखळे यांनी लिहिल्या असून त्यांना संगीतकार निखिल महामुनी यांनी संगीतसाज चढवला आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी जितेंद्र रामचंद्र आचरेकर यांनी, तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. सचिन एच. पाटील यांनी कला दिग्दर्शन केले असून, नरेंद्र पंडीत यांनी कोरिओग्राफी केली आहे.

अमिताभ बच्चनच्या डॉनचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हनी सातमकर यांनी पार्श्वसंगीत दिले असून, सुमीत ओझा यांनी व्हीएफएक्स केले आहेत. नितीन दांडेकर यांनी मेकअप केला असून, शीतल लीना लहू पावसकर यांनी कॉस्च्युम डिझायनिंगसह स्टाईल केली आहे. साहसदृश्ये दिग्दर्शित करण्याचे काम फाईट मास्टर मोहित सैनी यांनी केले आहे. अकबर शेख या चित्रपटाचे प्रोडक्शन कंट्रोलर, तर कुंडलिक कचले कास्टिंग समन्वयक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या