‘एक दिवस या शहरावर मी राज्य करीन’; संघर्षाला पडलेल्या स्वप्नाची साठी…

‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘कभी खुशी कभी गम’ —या प्रत्येक चित्रपटात त्यानं प्रेमाला एक वेगळी भाषा दिली.

  • Written By: Published:
ShahRukh Khan Birthday Special

Shah Rukh Khan birthday special:मुंबईच्या मरीन ड्राईव्हकडे पाहत एका तरुणानं एकदा म्हटलं होतं, “एक दिवस या शहरावर मी राज्य करीन”.त्या क्षणी तो फक्त दिल्लीतून आलेला एक मुलगा होता. डोळ्यात होती असंख्य स्वप्नं …आज, साठ वर्षांनंतर, तो “शाहरुख खान — द किंग ऑफ हार्ट्स” आहे.


2 नोव्हेंबर 1965

दिल्लीतल्या एका साध्या घरात जन्मलेला एक मुलगा—शाहरुख.घर श्रीमंत नव्हतं, पण घरातलं वातावरण स्वप्नांनी भरलेलं होतं.आई शिक्षक होती, वडील वकील —विचाराने प्रगत, पण आर्थिकदृष्ट्या संघर्षमय. लहानपणापासूनच शाहरुखनं शिकलेला पहिला धडा म्हणजे —“स्वतःवर विश्वास ठेवलास तर जग तुला नक्की ओळखेल.” (Shah Rukh Khan birthday special)

दिल्लीतलं बालपण — जिद्दीच्या पायाभरणीचा काळ

शाहरुखच्या आयुष्यात लहानपणीच अनेक वळणं आली.आई-वडिलांचं निधन ही त्याच्यासाठी सर्वात मोठी पोकळी ठरली.पण त्या दुःखानं त्याला मागे ओढलं नाही; उलट तेच दुःख त्याच्या प्रवासाचं इंधन बनलं. थिएटर आणि कॉलेजच्या नाटकांमधून त्यानं स्वतःला घडवायला सुरुवात केली. त्या रंगमंचावरून उभं राहून तो स्वप्न पाहत होता —मोठ्या पडद्याचं.


मुंबई —जिथे प्रत्येक स्वप्नाला किंमत असते

संपूर्ण आयुष्याची गुंतवणूक घेऊन तो मुंबईत आला.ना कोणी ओळखीचे, ना हमी असलेली नोकरी —
फक्त एका बॅगेत कपडे आणि डोळ्यांत स्वप्न.त्या स्वप्नांमध्ये एक गोष्ट ठाम होती — “मी हार मानणार नाही.”


फौजीने संधी दिली…‘दीवाना’ (1992) ने चेहरा दिला

मग आले ‘बाझीगर’, ‘डर’, ‘अंजाम’ —हिरोच्या पलीकडे असणारा अँटी हिरो…त्यानं दाखवलं की हिरो असणं म्हणजे केवळ चांगला माणूस नव्हे, तर मानवी भावनांच्या अंधाराकडेही पाहण्याचं धैर्य.


हृदयांवर राज्य करणारा बादशहा

1995 मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’नं इतिहास बदलला. राज-सिमरन फक्त पात्र नव्हते,ते संपूर्ण भारताच्या प्रेमकथेचं प्रतीक बनले.त्या क्षणापासून शाहरुख हा फक्त अभिनेता नव्हता, तर प्रेमाचे प्रतीक झाला.

‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘कभी खुशी कभी गम’ —
या प्रत्येक चित्रपटात त्यानं प्रेमाला एक वेगळी भाषा दिली. ती त्या काळातील यूथच्या प्रेमाची परिभाषा झाली…
त्याच्या डोळ्यांतून बोलणारं भावनिक विश्व
लोकांच्या मनात घर करून गेलं.


कलाकाराचा विस्तार — स्वप्नांपासून समाजापर्यंत

शाहरुखनं केवळ मनोरंजन केलं नाही, तर समाजालाही विचार करायला लावला.‘चक दे! इंडिया’मध्ये देशप्रेम,
‘स्वदेस’मध्ये जबाबदारी, आणि ‘माय नेम इज खान’मध्ये मानवतेचा सन्मान —या सर्व भूमिकांमधून तो केवळ सुपरस्टार झाला नाही तर राज्य करत असताना मुख्य प्रवाहामध्ये आपण प्रयोग करू शकतो, नव्याने रिस्क घेऊ शकतो ही ताकद असणारा… स्वतःवर प्रचंड मेहनत घेणारा ऑल टाइम फेवरेट सुपरस्टार…


“मन्नत” — स्वप्नाचं प्रतीक

मुंबईत येताना त्याने ‘मन्नत’ या बंगल्याकडे बोट दाखवत म्हटलं होतं —“एक दिवस हे माझं घर असेल.”
आज ते घर केवळ दगडमातीचं नाही,तर प्रत्येक मेहनती माणसाच्या स्वप्नाचं प्रतीक आहे.शाहरुख स्वतः म्हणतो —“माझं आयुष्य म्हणजे एक चित्रपट आहे —नायकाने हार मानली असती, तर शेवट झाला असता; पण त्याने प्रयत्न सुरू ठेवले, म्हणून कथा पुढे गेली.”


प्रेरणेचा स्रोत — अपयश, टीका आणि पुनर्जन्म

2010 नंतर काही चित्रपट चालले नाहीत, लोक म्हणाले — “किंग संपला.” पण त्यानं पुन्हा उभं राहून ‘पठाण’ आणि ‘जवान’मधून जगाला दाखवलं .“किंग कधी रिटायर होत नाही.” आज तो 60 वर्षांचा आहे,
पण त्याचं मन अजूनही 25 वर्षांचं आहे — स्वप्नांनी भरलेलं…


खरं शाहरुखपण — फक्त पडद्यावर नाही, आयुष्यातही

शाहरुख खान म्हणजे केवळ अभिनय नाही, तर आत्मविश्वासाची भाषा आहे. तो शिकवतो —की जिथे तुम्ही जन्मलात ते ठिकाण तुमचं भविष्य ठरत नाही; तुमचा दृष्टिकोन आणि जिद्द ठरवते,
तुम्ही किती उंच भरारी घ्याल ते. त्याच्या प्रत्येक संवादामागे एक तत्त्व आहे,त्याच्या प्रत्येक स्मितामागे एक अनुभव.
आणि त्याच्या प्रत्येक फिल्ममागे —एक मेहनती, संवेदनशील, मनस्वी माणूस आहे. त्याचा खरा कस लागला तो आर्यनच्या कैदेच्या काळात. सिस्टीम समोर हतबल असतील त्याच्यातला बाप त्यावेळी पदोपदी जाणवत राहिला… सुहानाच्या मोठा होण्यात त्याच्या डोळ्यातली काळजी दिसत होतीच अबरामच्या येण्यानंतर तो पूर्वीपेक्षा अधिक सॉफ्ट झालेला भासला.

इंडस्ट्रीत असं म्हटलं जातं की, मल्टी टास्किंगमध्ये त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. प्रचंड तल्लख आणि कुशाग्र बुद्धीचा अविश्रांत मेहनत करण्याची या वयातही तयारी आहे… हे आज किंग जाहीर करताना दिसतोय.

उण्यापुऱ्या ‘साठी’चा हा प्रवास …

अन् पिक्चर अभी भी बाकी है…आज शाहरुख खान साठाव्या वर्षात प्रवेश करतोय.पण त्याचं आयुष्य अजूनही प्रेरणादायी चित्रपटासारखं आहे. संघर्ष, प्रेम, अपयश, यश आणि आशेचं एक सुंदर मिश्रण. तो आजही आपल्याला शिकवतो. “खरा नायक तोच, जो पडदा संपल्यानंतरही लोकांच्या मनात जगत राहतो.”


शुभेच्छा, शाहरुख,
तुझ्या प्रत्येक स्मितामध्ये अजूनही दिल्लीचा तो मुलगा दिसतो,जो म्हणतो —“हसत रहा… स्वप्नं पाहत रहा कारण तीच खऱ्याखुऱ्या रसरसलेल्या जगण्यातलं सौंदर्य आहे.”

अमित भंडारी, चित्रपट समीक्षक, सोहम ग्रुप डिजिटलचे सीईओ

follow us