गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमीत ‘बंध विमोचन राम’ गाण्याचे भावपूर्ण अनावरण

समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर भक्तिमय वातावरणात या गीताचे अनावरण करण्यात आले.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 30T180145.327

Soul-stirring unveiling of the song ‘Bandh Vimochan Ram’ : गुरुपौर्णिमा… गुरुंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा दिवस! समर्थ रामदास स्वामींच्या विचारांनी अनेक पिढ्यांना जीवनाची दिशा दिली. त्याच समर्थ विचारांचा जागर करणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘बंध विमोचन राम’ या भक्तिरसपूर्ण गीताचे गुरुपौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर भक्तिमय वातावरणात अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या गीताचे चित्रीकरणही याच पवित्र भूमीत झाले असल्याने हा सोहळा अधिकच भावपूर्ण ठरला.

समर्थांच्या स्मृतींनी भारावलेल्या सज्जनगडावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित राहून गीताचे अनावरण केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य, सज्जनगडाचे पावित्र्य आणि समर्थांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव यामुळे हा क्षण केवळ एका गाण्याच्या अनावरणापुरता मर्यादित न राहता समर्थ विचारांना अभिवादन करणारा एक सांस्कृतिक सोहळाच ठरला. ‘बंध विमोचन राम’ हे भक्तिगीत समर्थ रामदास स्वामींच्या परमशिष्या संत वेण्णास्वामी यांनी रचलेले असून, त्यांची समाधीही सज्जनगडावरील समर्थांच्या समाधीच्या समीप आहे.

गुरु-शिष्य परंपरेचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या संत वेण्णास्वामींच्या या अर्थपूर्ण रचनेला ज्येष्ठ संगीतकार केदार पंडित यांनी सुरेल संगीत दिले असून, आर्या आंबेकर यांच्या भक्तिरसपूर्ण स्वरांनी या गीताला विशेष उंची प्राप्त झाली आहे. यावेळी या संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी म्हणाले, ‘या गाण्याचे अशा ठिकाणी अनावरण होणे, ही आनंदाची बाब आहे. याचे सादरीकरण, संगीत, आवाज खूपच सुंदर आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट सगळ्यांना नक्कीच आवडेल.’’

आपण भारतात राहतो, दोन झुरळांसाठी हॉटेलचा परवाना निलंबित करणे कितपत योग्य? कोर्टाचा एफडीएला सवाल!

दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणाले, “‘समर्थ’ हा चित्रपट समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आजच्या पिढीशी संवाद घडवण्याचा प्रयत्न आहे. ‘बंध विमोचन राम’ या गीताचे सज्जनगडावर, तेही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनावरण होणे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या पवित्र भूमीत उभे राहून हे गीत अर्पण करताना तो केवळ चित्रपटाचा क्षण नव्हता, तर समर्थांच्या चरणी वाहिलेली भावपूर्ण आदरांजली होती.”

निर्माते रविंद्र पाठक म्हणाले, “‘समर्थ’मधील प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक गीतामागे एक विचार आहे. ‘बंध विमोचन राम’ हे गीत भक्ती, समर्पण आणि आत्ममुक्तीचा संदेश देणारे आहे. त्यामुळे त्याचे अनावरण समर्थांच्या कर्मभूमीतच व्हावे, अशी आमची इच्छा होती. हे गीत प्रत्येकाच्या मनात श्रद्धा, संस्कार आणि सकारात्मकतेची ज्योत प्रज्वलित करेल, असा मला विश्वास आहे.”

क्रिएटिव्ह प्रोड्यूसर अमोल भगत म्हणाले, “‘समर्थ’च्या प्रत्येक प्रचार उपक्रमामागे चित्रपटाचा आध्यात्मिक आशय जपण्याचा प्रयत्न आहे. सज्जनगडावर माध्यम प्रतिनिधी आणि संपूर्ण टीमच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. ‘समर्थ’ हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही, तर प्रेरणा, श्रद्धा आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टीही देईल.”

मोठी बातमी : महिलांसाठी आरक्षित असलेले सरपंचपद पुढील कार्यकाळात सर्वसाधारण; न्यायालयाचा सरकारला झटका

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए3 इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ या चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलफगर यांनी केले आहे. चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक काळाशी जोडणारा ‘समर्थ’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 14 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

follow us