बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटामधील ‘गणेश वंदना’!

टीझरमध्ये एका चिमुकलीची ‘मोठं व्हायचंय’ ही निरागस इच्छा आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तिने बाप्पाकडे घातलेलं साकडं पाहायला मिळालं होतं.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 11T151638.695

The ‘Ganesh Vandana’ from the movie ‘Aali Mothi Shahani’! : गणरायाच्या भक्तीत तल्लीन करणारी आणि उत्सवी वातावरणाला सुरेल रंग देणारी ‘आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘गणेश वंदना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बाप्पाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करणाऱ्या या गाण्यात भक्तिरसासोबतच उत्सवाचा आनंद आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. चित्रपटाच्या टीझरमध्ये एका चिमुकलीची ‘मोठं व्हायचंय’ ही निरागस इच्छा आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तिने बाप्पाकडे घातलेलं साकडं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या गणेश वंदनेतूनही चित्रपटाच्या कथेशी जोडलेला बाप्पाचा धागा अधोरेखित होतो.

नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले अभय जोधपूरकर यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला भक्तिरसाची अनुभूती मिळते. पंकज पडघन यांच्या संगीत रचनेतून गाण्याचा उत्सवी बाज खुलतो, तर गुरु ठाकूर यांच्या शब्दांमधून बाप्पाप्रतीची श्रद्धा आणि भक्तिभाव प्रभावीपणे व्यक्त होतो.

संगीत दिग्दर्शक पंकज पडघन म्हणतात, ‘’ ‘गणेश वंदना’ हे गाणं तयार करताना भक्तिभाव आणि उत्सवाचा आनंद यांचा सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न केला. बाप्पाशी जोडलेली श्रद्धा आणि ‘आली मोठी शहाणी’ च्या कथेतील भावनिक धागा संगीताच्या माध्यमातूनही जाणवावा, हीच आमची भूमिका होती. बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात हे गाणं प्रेक्षकांच्या मनातही आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, अशी आशा आहे.’’

पुढचा नंबर अध्यक्षांचा, एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी बिग्रेडने फासले काळे

लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’च्या कथेत गणपती बाप्पाशी जोडलेला भाव खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे गणेश वंदना ही केवळ उत्सवाचा भाग न राहाता कथेच्या भावविश्वाशी जोडलेली असावी, अशी आमची इच्छा होती. गाण्यात भक्तिभावासोबतच एक प्रसन्न ऊर्जा जाणवावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. या गाण्याला मिळालेला प्रतिसाद नक्कीच आनंद देणारा आहे.”

निर्मात्या ईशा मुठे व श्रुती साठे म्हणतात, “ ‘आली मोठी शहाणी’च्या माध्यमातून मनाला भिडणारी गोष्ट प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कथेच्या प्रवासात गणपती बाप्पाशी जोडलेला भाव सुरुवातीपासूनच महत्त्वाचा आहे. त्यामुळे चित्रपटासाठी गणेश वंदना करताना तिच्यात भक्तिभावासोबतच उत्सवाचा आनंद आणि सकारात्मक ऊर्जा असावी, याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं. बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात हे गाणं प्रेक्षकांच्या मनातही आनंद निर्माण करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

आनंद दिलीप गोखले लिखित-दिग्दर्शित ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची निर्मिती फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क यांच्या वतीने करण्यात आली आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us