Passes Away : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा
चेन्नई : ज्येष्ठ दक्षिण भारतीय गायिका वाणी जयराम यांचं आज शनिवार 4 फेब्रुवारीला निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण भारतासह सर्वच संगीत क्षेत्रावर यामुळे शोककळा पसरली आहे.
चेन्नईतील हैडोस रोड, नुंगमबक्कम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नुकतच त्यांनी त्यांच्या करिअरची 50 वर्ष पूर्ण केली. त्यांच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी भारतातील 18 भाषांमध्ये तब्बल 10,000 हून अधिक गाणी स्वरबद्ध केली आहेत.
त्यांना 3 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांना अलीकडेच देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी जयराम यांनी हिंदीसह तमिळ, कन्नड आणि अन्य भाषांमध्ये पार्श्वगायन केले. 1971 मध्ये वाणी जयराम यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली होती.