विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती “बेवारस” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'बेवारस' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (17)

Vikram Gokhale’s last work “Bewaras” to be released soon : मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित “बेवारस” या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सनं केली आहे. हरिणी प्रॉडक्शन्सच्या रिया कुमार, नितीन विचारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे . चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन विजय राणे यांचं आहे.तर पटकथा, संवाद लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, यूजीन डिसोझा आणि महेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत तर यश सुर्वे यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

डोळे भरून आलेल्या विक्रम गोखले यांनी एका लहान मुलाला मिठी मारल्याचं चित्र पोस्टरवर आहे. पोस्टरप्रमाणेच चित्रपटाची कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे. एक लहान अनाथ मुलगा आपल्या अधिकारांसाठी आपल्याच आई वडिलांना कोर्टात का खेचतो? त्या लहान मुलाच्या संघर्षाची अनोखी कथा या चित्रपटात दाखविण्यात आली असून सोबत सामाजिक परिस्थितीचा पदरही या कथानकाला आहे. त्यामुळे विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती असलेल्या या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

follow us