भाजप नेत्या पंकजा मुंडे या श्रावण महिन्याचे औचित्य साधून धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत. या दौऱ्याला शिवशक्ती परिक्रमा असं नाव देण्यात आलं.
राज्यातून अनेक जिल्ह्यातून पंकजा मुंडेंची ही यात्रा जाणार आहे. या यात्रेचा आज पहिला दिवस होता.
औरंगाबाद येथील संत भगवान बाबा मंदिरात दर्शन घेऊन पंकजा मुंडेंनी परिक्रमेला सुरुवात केली.
औरंबादहून त्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्या. येवला येथून सप्तश्रृंगी गडाकडे जाताना रस्त्यात विंचूर, बोकडदरा, शिवरे फाटा येथे कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात अभूतपूर्व असे स्वागत केले.
यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कार्यर्त्यांची गर्दी होती. जेसीबीच्या साहाय्याने पंकजा मुंडे यांच्यावर कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण केली. यावेळी हजारोंचा जनसुमदाय जमला होता.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या दौऱ्याकडे राजकीयदृष्टीने न पाहण्याचं आवाहन केलं. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने पंकजा यांच्या यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
त्यामुळं आगामी निवडणुकांत पंकजा मुंडेंना या परिक्रमा यात्रेचा काही फायदा होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.