राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या निकाल आता हाती आला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करून काँग्रेसच्या हेमंत रासने यांनी विजय मिळवला आहे.
भाजपचा गड मानला जाणाऱ्या कसबा मतदारसंघातून विजय मिळवत धंगेकर यांनी स्वतःला जायंट किलर म्हणून सिद्ध केलं आहे.
रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती. त्यानंतर ते बराच काळ राज ठाकरे यांच्या मनसेत स्थिरावले. मनसेमध्ये असताना धंगेकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे.
मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. मनसे मध्ये असतानाच ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून आले. धंगेकर हे तब्बल ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
लोकांना २४ तास उपल्बध असणारा नेता म्हणून धंगेकर यांची ओळख आहे. नरसेवक असताना त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावर त्यांनी विधानसभाही लढवली.
मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांनी गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. कसब्यातील दिग्गज नेते असणारे बापट नवख्या धंगेकरांपुढे अवघ्या ७ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.
२०१४ मध्येही कसबा पेठेतून धंगेकरांनी निवडणूक लढवली, मात्र मोदी यांच्या लाटेत त्यांचा पराभव झाला.
जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, २०१९ मध्ये काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांऐवजी अरविंद शिंदेंना तिकीट दिलं.
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडुकीत मात्र धंगेकर यांनी तगडं आव्हान देत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आणि विजय मिळवला आहे.