डोकलाम-गलवान संघर्षाच्या मास्टरमाईंडची हकालपट्टी, चीनची कमान सांभाळणाऱ्या जनरल झाओ झोंगकींवर कारवाई

झाओ यांच्याविरोधात भ्रष्टाचार किंवा अन्य कोणत्याही प्रकरणाची चौकशी सुरू आहे का, याबाबत बीजिंगने कोणतीही माहिती दिलेली नाही.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 29T131222.572

Action against General Zhao Zhongqi : भारतासोबतच्या 2017 मधील डोकलाम तणाव आणि 2020 मधील गलवान संघर्षाच्या काळात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे नेतृत्व करणारे जनरल झाओ झोंगकी यांना चीनच्या सर्वोच्च राजकीय सल्लागार संस्थेतून हटवण्यात आले आहे. झाओ यांचे चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स अर्थात CPPCC चे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, त्यांना आणखी दोन महत्त्वाच्या पदांवरूनही हटवण्यात आले आहे. मात्र, या कारवाईमागचे नेमके कारण चीनने स्पष्ट केलेले नाही.

26 ऑगस्ट रोजी झाओ यांना CPPCC च्या 14 व्या राष्ट्रीय समितीच्या स्थायी समितीतून हटवण्यात आले. तसेच जातीय आणि धार्मिक व्यवहार समितीच्या उपसंचालक पदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ आणि कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ यांनी या निर्णयाची माहिती दिली. मात्र, झाओ यांच्याविरोधात भ्रष्टाचार किंवा अन्य कोणत्याही प्रकरणाची चौकशी सुरू आहे का, याबाबत बीजिंगने कोणतीही माहिती दिलेली नाही.

झाओ यांच्यावरील कारवाईमुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या PLA मधील व्यापक कारवाईची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याच काळात वरिष्ठ जनरल झांग यौशिया आणि लिऊ झेनली यांनाही चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनमधून हटवण्यात आले. त्यांच्याविरोधात ‘शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन’ केल्याच्या संशयावरून चौकशी झाल्याचे वृत्त आहे. शी जिनपिंग यांनी 2012 पासून सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत आतापर्यंत अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

जरांगेंच्या उपोषणाआधीच मोठी मागणी; सदावर्तेंचा जोरदार विरोध, आरक्षणावरून पुन्हा संघर्ष

भारताच्या दृष्टीने झाओ झोंगकी यांचे नाव विशेष महत्त्वाचे आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये PLA च्या पुनर्रचनेनंतर ते वेस्टर्न थिएटर कमांडचे पहिले कमांडर बनले होते. तिबेट आणि शिनजियांगसह भारत-चीन सीमेच्या मोठ्या भागावरील चिनी लष्करी कारवायांची जबाबदारी याच कमांडकडे आहे. 2017 मध्ये डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य तब्बल 72 दिवस आमनेसामने होते. चीनने वादग्रस्त भागात रस्ता पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैन्याने हस्तक्षेप केला आणि दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ लष्करी तणाव निर्माण झाला. या संपूर्ण काळात वेस्टर्न थिएटर कमांडची सूत्रे झाओ यांच्या हातात होती.

यानंतर मे 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव वाढला. 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनने अधिकृतरीत्या आपल्या चार सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली होती, मात्र चीनची प्रत्यक्ष जीवितहानी यापेक्षा अधिक असल्याचे विविध स्वतंत्र अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता.

गलवान संघर्षानंतर झाओ यांच्या भूमिकेबाबत आणखी एक गंभीर दावा समोर आला. अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या कथित मूल्यांकनाचा हवाला देत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, झाओ यांनीच गलवानमधील कारवाईला मंजुरी दिली होती. भारताला ‘धडा शिकवण्याच्या’ उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा त्या अहवालात करण्यात आला होता. मात्र, चीनने या दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

पुण्यात DJ, प्लाझ्मा आणि लेझरविरोधात जनजागृती सभा; रविवारी गुडलक चौकात होणार मेळावा

डिसेंबर 2020 मध्ये निवृत्तीचे वय पूर्ण झाल्यानंतर झाओ यांना वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रमुखपदावरून बदलण्यात आले. त्यानंतरही ते चीनच्या राजकीय व्यवस्थेतील महत्त्वाच्या पदांवर कायम होते. आता जवळपास सहा वर्षांनंतर त्यांचे CPPCC सदस्यत्व रद्द करून इतर पदांवरूनही त्यांना हटवण्यात आले आहे. झाओ यांच्यावरील कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा चीनच्या लष्करातील वरिष्ठ नेतृत्वात मोठी उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे डोकलाम आणि गलवान या भारत-चीन संबंधांतील दोन अत्यंत गंभीर लष्करी संघर्षांच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या झाओ झोंगकी यांची अचानक झालेली राजकीय हकालपट्टी चर्चेचा विषय ठरली आहे.

चीनने या कारवाईचे कारण अद्याप जाहीर केले नसल्याने झाओ हे शी जिनपिंग यांच्या PLA मधील व्यापक कारवाईचे पुढचे लक्ष्य ठरले आहेत का, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

follow us