पदवीच्या मागे धावणाऱ्यांनो नक्की वाचा! अमेरिकेत टेलरला मिळतो इंजिनिअरपेक्षा जास्त मान अन् दाम
American Tailor अमेरिकेत फॅशन, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि वैयक्तिक गरजांनुसार 'कस्टम फिट' कपड्यांची क्रेझ प्रचंड आहे.
American Tailor Income : आजच्या स्पर्धेच्या युगात पदवीच्या मागे धावणाऱ्या तरुणांच्या गर्दीत, एक अशी बातमी समोर आली आहे जी आपली विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. भारतात ज्या टेलरिंगच्या कामाला अनेकदा कमी महत्त्वाचे किंवा साधे काम मानले जाते, त्याच कौशल्याने अमेरिकेत अनेकांना श्रीमंतीची स्वप्ने पूर्ण करून दिली आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कोमल पांडे यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार शेअर होत आहे. नेमकं कोमल पांडे यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी अमेरिकेतल्या टेलर्सबद्दल काय सांगितलंय? ते दिवसाला किती कमाई करतात याबद्दल जाणून घेऊया…
कमाईचा आकडा थक्क करणारा
अमेरिकेतील टेलरिंग व्यवसायातील कमाईचा आकडा खरोखरच अवाक करणारा आहे. येथे एका तासाच्या शिलाई कामासाठी कारागिराला 25 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 2200 ते 2300 रुपये मोबदला मिळतो. गणिताची ही मांडणी पाहिली तर, एक कुशल टेलर दिवसाला 8 तास काम करून सहजपणे 18 हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतो. केवळ नवीन कपडे शिवणेच नव्हे, तर तयार कपड्यांच्या फिटिंगसाठी येथे ग्राहकांना 40 डॉलर्स म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये सुमारे 3500 ते 4000 एवढी रक्कम मोजावी लागते.
View this post on Instagram
अमेरिकेत टेलरिंगला इतकी मागणी का?
मोठी लोकसंख्या आणि कमी मजुरी खर्चामुळे भारतात शिलाईचे काम अमेरिकेपेक्षा स्वस्त आहे. याउलट तिथे रेडीमेड कपडे विकत घेतल्यानंतरही ते शरीराच्या मापाप्रमाणे अचूक करून घेण्यासाठी व्यावसायिक टेलरची मदत घेतली जाते. वाढते दुकान भाडे, करांचे ओझे आणि कुशल कारागिरांची कमतरता यामुळे तिथे प्रत्येक ‘सर्व्हिस’ महाग असली, तरी त्याचा थेट फायदा त्या कामात निपुण असलेल्या व्यक्तीला मिळतो. तिथे कामाला प्रतिष्ठा आहे आणि मेहनतीला योग्य मोबदलाही.अमेरिकेत फॅशन, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि वैयक्तिक गरजांनुसार ‘कस्टम फिट’ कपड्यांची क्रेझ प्रचंड आहे.
View this post on Instagram
कोमल पांडे यांच्या व्हिडिओनंतर समोर आलेल्या आकड्यांनतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. अनेक युजर्सनी आपल्याकडेही कौशल्यावर आधारित कामांना तितकाच मान आणि योग्य मोबदला मिळायला हवा, जो पाश्चात्य देशांत दिला जातो असे म्हटले आहे. तर, काहींनी पदवीच्या कागदांपेक्षा आपल्या हातातील कौशल्य जर अचूक असेल, तर हेच कौशल्य तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मानाने आणि समृद्धीने जगवू शकतो हे अधोरेखित होत असल्याचे म्हटले आहे.