Microsoft Employee : माइक्रोसॉफ्टच्या 10 हजार कर्मचाऱ्यांवर संक्रांत
नवी दिल्ली : मंदीच्या भीतीने मायक्रोसॉफ्ट या दिग्गज कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे. कंपनीचा घटता महसूल ही मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या आधी Amazon, Salesforce सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतातील स्टार्टअप कंपनी शेअरचॅटनेही 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.
कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, आर्थिक वर्ष 2023 च्या अखेरीस सुमारे 5 टक्के कामगारांची संख्या कमी होईल. कंपनीने या निर्णयामागे वाईट आर्थिक स्थितीचा हवाला दिला आहे.
मायक्रोसॉफ्टने सांगितले की त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची माहिती दिली आहे. यातील काही तात्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आले आहेत. कंपनीने म्हटले आहे की ती त्याच्या हार्डवेअर विभागामध्ये सुधारणा करत आहे आणि काही ऑफिस स्पेस लीज कमी करत आहे. कंपनीच्या या पावलांमुळे सुमारे $1.2 बिलियनची बचत होईल.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले, आम्ही आमच्या भविष्यासाठी धोरणात्मक गुंतवणूक करत राहू. म्हणजेच, दीर्घकालीन वाढीवर लक्ष केंद्रित करून आम्ही आमचा पैसा आणि प्रतिभा वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवू. ते म्हणाले, आतापर्यंत या प्रवासात ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ज्या कर्मचाऱ्यांची छाटणी केली जाईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की अशा कर्मचार्यांना 6 महिने हेल्थकेअर कव्हरेज सारख्या सुविधा, सेवा समाप्तीपूर्वी 60 दिवसांची नोटीस दिली जाईल.