निषेधाची अनोखी शैली; एपस्टीन प्रकरणावर कलाकारांचा प्रहार; ‘टायटॅनिक’ पोझमधील ट्रम्प-एपस्टीन पुतळा चर्चेत
जेफ्री एपस्टीन आणि ट्रम्प यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित एक कलाकृती वॉशिंग्टन येथे उभारण्यात आली असून ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Trump-Epstein statue in ‘Titanic’ pose sparks controversy : एपस्टीन फाईल्समधून समोर आलेल्या विविध खुलाशांमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक जागतिक स्तरावरील नामांकित व्यक्तींची नावे चर्चेत आली असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील नाव या कागदपत्रांमध्ये आल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर जेफ्री एपस्टीन आणि ट्रम्प यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित एक वादग्रस्त कलाकृती अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे उभारण्यात आली असून ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
टायटॅनिकमधील प्रसिद्ध पोझची आठवण करून देणाऱ्या शैलीत हा पुतळा उभारण्यात आला आहे. टायटॅनिक चित्रपटातील आयकॉनिक पोझमध्ये ट्रम्प आणि एपस्टीन यांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे. ही कलाकृती “सीक्रेट हँडशेक” नावाच्या कलाकारांच्या समूहाने तयार केल्याचे सांगितले जात आहे. या शिल्पाच्या माध्यमातून एपस्टीन प्रकरणातील कथित संबंधांबाबत निषेध आणि प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
एपस्टीनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासह अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते. या प्रकरणात त्याच्याशी संबंधित असलेल्या काही प्रभावशाली राजकीय, व्यावसायिक आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या संबंधांबाबत दीर्घकाळ चर्चा होत आली आहे. त्यामुळे ट्रम्प आणि एपस्टीन यांची एकत्रित प्रतिमा दर्शवणारी ही कलाकृती सोशल मीडियावर आणि स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Harish Rana : १३ वर्षांचा मूक वनवास संपला; बापानेच मागितलं लेकासाठी ‘इच्छामरणाचं दान’
दरम्यान, अमेरिकेच्या न्याय विभागाने गेल्या महिन्यात एपस्टीन प्रकरणाशी संबंधित मोठ्या प्रमाणातील कागदपत्रे, छायाचित्रे आणि नोंदी सार्वजनिक केल्याचे वृत्त आहे. या कागदपत्रांमध्ये काही ठिकाणी ट्रम्प यांचे नाव आल्याचे सांगितले जात असले तरी ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्याविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप पूर्णपणे नाकारले आहेत.
विशेष म्हणजे, ट्रम्प आणि एपस्टीन यांच्या कथित संबंधांवर भाष्य करणाऱ्या अशा प्रकारच्या प्रतीकात्मक कलाकृती यापूर्वीही अमेरिकेत विविध ठिकाणी दिसून आल्या आहेत. अनेकदा प्रशासनाने हस्तक्षेप करून वादग्रस्त शिल्पे किंवा इंस्टॉलेशन्स हटवली आहेत. एपस्टीन फाईल्समध्ये माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स, तंत्रज्ञान उद्योजक एलोन मस्क, प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग आणि पॉपस्टार मायकल जॅक्सन यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांचा उल्लेख झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे जगभरातून मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
