शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा देत शांतता करार लवकर न झाल्यास खूप वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 41 1

Trump’s statement causes a stir : पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच अमेरिका, इराण, इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील घडामोडींना वेग आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा देत शांतता करार लवकर न झाल्यास खूप वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. त्यामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात एप्रिपासून लागू असलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांनी राजकीय तोडग्यासाठी नव्याने चर्चा सुरू करण्याचे मान्य केले असले, तरी देखील दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे युध्दविरामाच्या प्रभावितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संघर्षाला आता जवळपास तीन महिने पूर्ण होत आले असून, अजूनही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यातच इराणने होर्मूझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी लवकरच नवी योजना जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तांनुसार, इराण या महत्वाच्या जलमार्गावर टोल प्रणाली लागू करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या समुद्रधुनीबाबतच्या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे लक्ष पुन्हा पश्चिम आशियाकडे वळले आहे.

Mobile Recharges : आणखी एक धक्का; पेट्रोल-डिझेलनंतर मोबाईल रिचार्जही महाग होणार?

याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने शांतता चर्चेत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर त्यांना अत्यंत कठीण काळाचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेची भूमिका अधिक आक्रमक होत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, इस्रायल आणि हिझबुल्लाह यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. अशातच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने गाझामधील हमासच्या कासम ब्रिगेडचे प्रमुख इझडाईन अल-हदाद यांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी अर्थात आयआरएनएच्या वृत्तानुसार, इराणने या कारवाईला “दहशतवादी कृत्य” असे संबोधत इस्रायलवर “पॅलेस्टाईनच्या वसाहतवादी उच्चाटनाचा” आरोप केला आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हद्दाद यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाची हत्या ही इस्रायलच्या “गुन्हेगारी धोरणाचा भाग” आहे. तसेच अमेरिकेवरही टीका करत, इस्रायलला लष्करी, आर्थिक आणि राजकीय पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेला या घटनांसाठी “सहभागी” ठरवण्यात आले आहे. इराणने पुढे म्हटले आहे की, पॅलेस्टिनी नेते आणि बुद्धिजीवी यांच्या हत्या म्हणजे इस्रायलच्या “हतबलतेचे आणि नैराश्याचे प्रतीक” आहे. गेल्या अनेक दशकांपासून हजारो निरपराध नागरिकांचा बळी घेऊनही पॅलेस्टिनी प्रतिकाराची भावना संपवण्यात इस्रायलला अपयश आल्याचा दावा देखील इराणने केला आहे.

पश्चिम आशियातील या वाढत्या संघर्षामुळे जागतिक राजकारण, तेल व्यापार आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us