शांततेची संधी हुकली! इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण चर्चा अपयशी, युद्ध पुन्हा सुरू होणार?

इस्लामाबादमधील अमेरिका आणि इराण यांच्यातील अत्यंत महत्वाच्या शांतता चर्चेला अखेर कोणताही ठोस तोडगा निघाल्याशिवाय पूर्णविराम मिळाला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 74

US-Iran talks fail : जागतिक शांततेच्या क्षितिजावर दोन आठवड्यानोपुर्वी उमटलेली शस्त्रसंधीची रेघ आता हळूहळू धूसर होताना दिसत आहे. इस्लामाबाद येथे पार पडलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील अत्यंत महत्वाच्या शांतता चर्चेला अखेर कोणताही ठोस तोडगा निघाल्याशिवाय पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल 21 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीनंतर देखील दोन्ही देश एकमत साधू शकले नाहीत, त्यामुळे आखाती प्रदेशासह संपूर्ण जगात पुन्हा एकदा अस्वथतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चर्चेनंतर जे. डी. व्हान्स यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

शांततेचा प्रामाणिक प्रस्ताव घेऊन आम्ही येथे आलो होतो, मात्र इराण आमच्या मूलभूत अति मान्य करण्यास तयार नाही, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेने आपला सर्वोत्तम आणि अंतिम प्रस्ताव मांडला होता, मात्र विशेषतः अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम राहिले. इराणने अण्वस्त्र कार्यक्रमावर कोणतीही तडजोड करण्यास नकार दिल्याने चर्चेची दिशा बिघडली. या उच्चस्तरीय बैठकीत अमेरिकेच्या वतीने जे. डी. व्हान्स यांच्यासह जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ सहभागी झाले होते. तर इराणकडून सय्यद अब्बास अराघची आणि मोहम्मद बागेर गालीबाफ यांनी भूमिका मांडली.

या चर्चेत मध्यस्थीची भूमिका शहाबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी निभावण्याची प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. चर्चेतील सर्वात मोठा अडथळा ठरला तो म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम. अमेरिकेचे मत स्पष्ट आहे, इराणला अण्वस्त्रे मिळवणे जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, इराणने आपल्या भूमिकेत कोणतीही माघार घेतली नाही. परिणामी कराराशिवाय परतत आहोत, असे सांगताना व्हान्स यांनी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली. आता या चर्चेचे सर्व निर्णय व्हाईट हाऊस येथे घेतले जाणार आहेत.

पुढील रणनीती ठरवण्याची जबाबदारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आहे. ते पुढे कोणती भूमिका घेतात आणि आखाती प्रदेशात शांतता प्रस्तापित करण्यासाठी कोणती पावले उचलतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. एकूणच, इस्लामाबादमधील या प्रदीर्घ चर्चेने शांततेची आशा निर्माण करण्याऐवजी जागतिक राजकारणात अनिश्चितता आणि तणाव अधिक वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

follow us