धाडस केलं अन् दाऊदची बातमी कोणी फोडली : कोण आहेत आरजू काझमी?
कराची : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊदवर खरंच विष प्रयोग करण्यात आला आहे का? याची अद्याप खात्री होऊ शकलेली नाही. पाकिस्तान (Pakistan) सरकारने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याशिवाय संपूर्ण पाकिस्तानात रात्रभर इंटरनेट बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Veteran journalist in Pakistan Arju Kazmi confirmed the talk that Dawood was poisoned)
आरजू काझमींनी केला दावा :
एकीकडे पाकिस्तान सरकार हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमधील धडाडीच्या ज्येष्ठ पत्रकार आरजू काझमी यांनी दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यामुळेच तिथले इंटरनेटही बंद करण्यात आले आहे असे त्यांनी म्हंटले.
Dawood Ibrahim चा खरंच मृत्यू झालाय? ‘तो’ एक स्क्रीनशॉट अन् बातम्यांमागील सत्य…
आरजू काझमी म्हणाल्या, ‘दाऊद इब्राहिमला कोणीतरी विष प्राशन केल्याचे ऐकले आहे. त्याची प्रकृती खूपच खालावली अद्यापही चिंताजनक आहे. त्याला कराचीतील एका रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. ही बातमी सोशल मीडियावर फिरत असून, हे कितपत खरे आहे, हे सध्यातरी कळू शकलेले नाही.
भीतीपोटी कोणी काही बोलत नाही :
भीतीमुळे दाऊद खरोखरच रुग्णालयात दाखल असल्याचा माहिती कोणी करणार नाही. याची खात्री करण्याच धाडस कोण दाखवू शकेल? तुम्हा लोकांना माहीत आहे की जर कोणी कोणाचेही नाव घेतले किंवा कशाचीही खातरजमा करण्याचा प्रयत्न केला तर तोही अडचणीत येईल.
ट्विटर असो किंवा गुगल सर्व्हिसेस किंवा यूट्यूब, ही सर्व अशी ठिकाणे आहेत जिथे लोक बोलू शकतात किंवा व्हिडिओ रिलीज करू शकतात किंवा फोटोसह काहीतरी लिहू शकतात. पण पाकिस्तानमध्ये सध्या हे सर्व प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले आहेत.
दाऊदवर विषप्रयोग! डोंगरीच्या गल्लीतून ‘पाकिस्तानात’ कसा गेला अंडरवर्ल्ड डॉन?
पाकिस्तानमध्ये ना ट्विटर उघडत आहे, ना गुगल सेवा सुरू आहेत ना यूट्यूब चॅनेल कार्यरत आहेत. या सर्व सेवा अचानक बंद का झाल्या? काहीतरी नक्कीच गडबड आहे. नक्कीच काहीतरी लपवले जात आहे. हे सर्व अचानक घडू शकत नाही. “दाल में कुछ काला जरुर है.” असाही संशय आरजू यांनी पुढे बोलताना व्यक्त केला.
दाऊद दोन दिवस रुग्णालयात दाखल :
दाऊद इब्राहिम दोन दिवसांपासून कराचीच्या रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात रात्रभर इंटरनेट बंद करण्यात आली आहे. दाऊदला अत्यंत सुरक्षेत रुग्णालयात नेण्यात आले. दाऊदबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत.
यातील एक दावा असा आहे की, ज्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे, त्याचे लष्कराच्या छावणीत रूपांतर झाले आहे आणि ज्या हॉस्पिटलमध्ये दाऊदला ठेवण्यात आले आहे, त्याच्या मजल्यावर तो एकटा आहे. मात्र, या सर्व दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.