नीट आंदोलनात मानवतेचे दर्शन; नागालँडच्या तरुणाने विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी खर्च केले तब्बल 67 हजार रुपये
विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी नागालँडच्या तरुणाने थेट जंतर मंतरवर 150 पिझ्झा पाठवून आंदोलनकर्त्यांना अनोखं पाठिंबा दिला आहे.
A display of humanity during the NEET protests : दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने दाखवलेल्या संवेदनशीलतेची देशभर चर्चा होत आहे. आंदोलनस्थळी उपस्थित राहता आले नाही, तरी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी या तरुणाने थेट जंतर मंतरवर १५० पिझ्झा पाठवून आंदोलनकर्त्यांना अनोखं पाठिंबा दिला आहे.
नागालँडमधील झा-ल्होऊ या तरुणाने डॉमिनोजमधून तब्बल 150 चीज बस्ट पिझ्झ्याच्या ऑर्डर विद्यार्थ्यांसाठी पाठवल्या. या ऑर्डरची एकूण किंमत 67 हजार 734 रुपये 18 पैसे इतकी होती. झा-ल्होऊ यांनी या ऑर्डरचे स्क्रीनशॉट सामाजिक माध्यमांवर शेअर करत विद्यार्थ्यांप्रती आपली भावना व्यक्त केली. 22 जुलै रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आलेल्या या ऑर्डरमध्ये कोरियन स्वीट चिली चीज बस्ट पिझ्झा आणि फार्महाऊस चीज बस्ट पिझ्झाचा समावेश होता. या ऑर्डरचे बिल देखील लक्षवेधी ठरले. पिझ्झाची मूळ किंमत 64 हजार 650 रुपये होती. त्यावर कर आणि पॅकेजिंग शुल्क मिळून 3 हजार 227 रुपये 28 पैसे आकारण्यात आले. सवलत कूपनचा लाभ घेतल्यानंतर 67 हजार 734 रुपये एवढी रक्कम या ऑर्डरची देण्यात आली.
या उपक्रमामागील भावना व्यक्त करताना झा-ल्होऊ यांनी लिहिले, आज रात्री माझे जेवण शांतपणे करू शकलो नाही. कारण हजारो विद्यार्थी आपल्या उज्वल भविष्यासाठी घरापासून दूर जंतरमंतरवर संघर्ष करत आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक जण उपाशी असून शकतात. मी नागालँडमध्ये बसलो आहे. मला आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही, मात्र किमान त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून मी त्यांना पाठिंबा देऊ शकतो.
विशेष म्हणजे, डॉमिनोजच्या वितरण प्रतिनिधीने जंतर मंतर येथे पोहोचल्यानंतर फोन करून ही ऑर्डर नेमकी कोणाला द्यायची अशी विचारणा केली. त्यावर झा-ल्होऊ यांनी ज्यांनी अजून जेवण केले नाही अशा कोणालाही ही ऑर्डर द्या असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने वितरण प्रतिनिधी देखील भावुक झाला. तुम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी देवासारखे आहात, अशा शब्दांत त्याने प्रतिक्रिया दिली.
सरकारच्या आश्वासनांवर विश्वास नाही? अभिजीत दिपके म्हणाले, राजीनामा होईपर्यंत संघर्ष सुरू राहील
झा-ल्होऊ यांनी ईशान्य भारतासह देशभरातील नागरिकांना आवाहन करत आंदोलनस्थळी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वीगी आणि झोमॅटोसारख्या माध्यमांतून अन्नपदार्थ पाठवून मदत करण्याचे आवाहन केले. दयाळूपणाची कोणतीही कृती लहान नसते, असे देखील त्यांनी नमूद केले. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनात आणखी एक महत्वाची घडामोड घडली आहे. गेल्या 26 दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गुरुवारी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात भेट घेऊन केंद्र सरकारतर्फे लेखी आश्वासन दिल्यानंतर वांगचुक यांनी पत्नी गीतांजली आंग्मो यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.
सरकारने दिलेल्या आश्वासनांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि 20 जुलैच्या संसद चलो मोर्चात सहभागी झालेल्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, संसदेत पेपरफुटी आणि परीक्षा सुधारणांवर सविस्तर चर्चा केली जाईल, तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसानभरपाई देण्याबाबाबत सकारात्मक विचार केला जाईल, यांचा समावेश आहे.
नागालँडमधील एका तरुणाने विद्यार्थ्यांसाठी पाठवलेल्या या मदतीमुळे आंदोलनाला मानवी संवेदनांचा स्पर्श मिळाला असून त्याच्या या कृतीचे देशभरातून कौतुक होत आहे.