बाल अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात सांगली न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; आरोपीला मरेपर्यंत फाशी
सव्वाचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Accused sentenced to be hanged until death : जत तालुक्यातील करजगी येथे सव्वाचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा ऐतिहासिक निकाल देत आरोपी पांडुरंग सोमन्ना कळ्ळी (वय 45, रा. करजगी) याला कठोर शिक्षा ठोठावली.
6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी गावात घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. सव्वाचार वर्षांची बालिका आपल्या चुलत बहिणीसोबत घरासमोरील परिसरात खेळत होती. खेळताना दोघी पांडुरंग कळ्ळी यांच्या घरासमोरील झाडाखाली बदाम खाण्यासाठी गेल्या. त्याचवेळी चुलत बहिणीला तिच्या आईने शाळेसाठी घरी बोलावले. त्यामुळे ती तेथून निघून गेली. बालिका एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिची संधी साधली.
पांडुरंग कळ्ळी याने बालिकेला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मृतदेह पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, बराच वेळ उलटूनही बालिका घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र ती कुठेही सापडली नाही. अखेर उमदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.
पिंपरी-चिंचवड हादरलं! आर्थिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्या; पतीनंतर पत्नी आणि मुलीचाही मृत्यू
चौकशीदरम्यान काही ग्रामस्थांनी बालिकेला शेवटचे आरोपी पांडुरंग कळ्ळी याच्यासोबत पाहिल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील लोखंडी पेटीत बालिकेचा मृतदेह आढळून आला आणि या भीषण गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करत पोलिसांनी अवघ्या 13 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर जलदगतीने खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
खटल्यादरम्यान एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षी आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, अल्पावधीत सुनावणी पूर्ण करून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या राज्यातील मोजक्या प्रकरणांमध्ये या खटल्याची नोंद झाली आहे. याआधी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
“संबंध सिद्ध करा, एका मिनिटात राजकारण सोडेन”; दिलीप वळसे पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान
त्यानंतर अशा प्रकारचा कठोर निकाल देण्यात आलेले हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे प्रकरण मानले जात आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे म्हणाले, करजगी येथील घटना अत्यंत क्रूर, समाजविघातक आणि संपूर्ण समाजमन हादरवणारी होती. या प्रकरणात न्यायालयाने दिलेली मरेपर्यंत फाशीची शिक्षा ही पीडितेला न्याय देणारी आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोर संदेश देणारा हा निकाल असून त्यामुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल.
या निकालामुळे पीडित कुटुंबाला काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, बालकांवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा संदेश न्यायालयाने दिल्याची चर्चा कायदेविषयक वर्तुळात होत आहे.