कंस आणि रावण मुस्लिम नव्हते; धर्मावर भाष्य करताना आदिल हुसैन यांची परखड भूमिका

एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी भगवद्गीता, कर्म, आत्मा, पुनर्जन्म, धर्म आणि जीवनाचा खरा अर्थ याविषयी आपले विचार मांडले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (54)

Adil Hussain’s forthright stance : सिनेमांमधील गंभीर आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते आदिल हुसैन सध्या त्यांच्या अध्यात्मिक विचारांमुळे चर्चेत आले आहेत. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी भगवद्गीता, कर्म, आत्मा, पुनर्जन्म, धर्म आणि जीवनाचा खरा अर्थ याविषयी आपले विचार मांडले. धर्माच्या चौकटींपलीकडे जाऊन ज्ञान आणि अध्यात्म समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पारस छाब्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना आदिल हुसैन यांनी भगवद्गीतेविषयी विशेष आदर व्यक्त केला. त्यांच्या मते, गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून स्वतःला समजून घेण्याचा, आपल्या कृतींचा विचार करण्याचा आणि जीवनातील निर्णयांचा अर्थ शोधण्याचा मार्ग आहे. एखाद्या व्यक्तीने काय केले यापेक्षा ते कोणत्या हेतूने केले, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कर्म आणि त्यामागील मानसिकता समजून घेतल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थ समजत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

भगवद्गीतेबद्दल बोलताना आदिल हुसैन म्हणाले, मी गीता का वाचू नये, हे मला समजत नाही. हा भारत आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे. या भूमीत जन्म घेऊनही इथल्या महान ज्ञानपरंपरेचा अभ्यास केला नाही, तर या देशात जन्म घेण्याचा अर्थच उरत नाही. मला भारतात जन्म मिळाला, हे माझे भाग्य आहे. धर्म आणि समाजातील भेदांबाबतही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. मुस्लिम धर्म सुमारे 1400 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. पण त्याआधीही जगात चांगले आणि वाईट लोक होते. श्रीकृष्णाचा शत्रू कंस मुस्लिम नव्हता आणि श्रीरामाशी युद्ध करणारा रावणही मुस्लिम नव्हता. चांगुलपणा आणि वाईटपणा यांचा धर्माशी संबंध नसतो. संकुचित विचारांचे लोकच धर्माच्या नावावर भेद निर्माण करतात, असे ते म्हणाले.

चरणोदक प्राशनाच्या व्हिडीओंनी निर्माण केला वाद; उमेश तागुंदे म्हणाले, भक्तांची भावना आहे

यावेळी त्यांनी संत रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचाही उल्लेख केला. यतो मत, ततो पथ म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगळा असू शकतो, असे सांगत त्यांनी विविध धर्म आणि आध्यात्मिक परंपरांमधील साम्य अधोरेखित केले. मी गीतेतून श्रीकृष्णाला जाणून घेतले आहे. मी राम, शिव तसेच सूफी संत रुमी यांच्याबद्दलही वाचले आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या सर्वांमध्ये कोणताही मूलभूत फरक नाही, असे त्यांनी म्हटले.

आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेरणास्रोतांविषयी बोलताना आदिल हुसैन यांनी आपल्या आजोबांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या मते, आजोबांनी त्यांना सूफी विचारसरणीची ओळख करून दिली आणि कधीही धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये, अशी शिकवण दिली. माझ्या आजोबांनी मला नेहमी सांगितले की, हे तुझे आयुष्य आहे. तुला जो मार्ग योग्य वाटतो, तो स्वीकार. पण तो मार्ग मानवता, प्रेम आणि सत्य यांच्याकडे घेऊन जाणारा असावा, असे त्यांनी सांगितले.

धर्मापेक्षा मानवता, श्रद्धेपेक्षा समज आणि परंपरेपेक्षा ज्ञान यांना अधिक महत्त्व देणारे आदिल हुसैन यांचे हे विचार सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अध्यात्म आणि धर्माकडे पाहण्याच्या व्यापक दृष्टिकोनाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

follow us