महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय हालचालींना वेग, राहुल, सोनिया गांधी, खरगे स्टॅलिन-पवारांच्या भेटीला

विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून खासदारांची जुळवाजुळव सुरू असतानाच विरोधी पक्षांची इंडिया आघाडीही सक्रिय झाली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 29T105214.653

Congress’s efforts to coordinate with allies : महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्र सरकारकडून आणण्यात येणारी संविधान (132 वी दुरुस्ती) विधेयक, 2026 सह तीन महत्त्वाची विधेयके सोमवारी (ता. 30) लोकसभेत मांडली जाणार आहेत. या विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून खासदारांची जुळवाजुळव सुरू असतानाच विरोधी पक्षांची इंडिया आघाडीही सक्रिय झाली आहे. द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), वायएसआर काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीने विधेयकांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सोमवारी चेन्नई आणि मुंबईचा दौरा करणार आहेत.

तिन्ही नेते एकाच विशेष विमानाने चेन्नईला रवाना होणार असून, त्यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही असतील. चेन्नईत ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मुंबईत येऊन रात्री 8.45 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. विधेयकांवरील चर्चा आणि मतदानापूर्वी मित्रपक्षांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने या भेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन खासदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे संसदेच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहणार आहेत. यामध्ये स्वतः शरद पवार आणि लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे यांचा समावेश आहे.

तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर बनवलं, निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा सुपरस्टारच्या मुलाबद्दल धक्कादायक खुलासा

दुसरीकडे, लोकसभेत द्रमुक खासदारांच्या आसनव्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. इंडिया आघाडीतील अन्य पक्षांपासून स्वतंत्र बसण्याची मागणी द्रमुक खासदार कनिमोझी यांनी केली होती. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने द्रमुकसाठी स्वतंत्र जागांची व्यवस्था केली आहे. या बदलामुळे समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या काही खासदारांच्या जागांमध्येही फेरबदल झाले आहेत. सुप्रिया सुळे या आता कनिमोझी यांच्यासोबत बसणार आहेत.

सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सहा माजी खासदारांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर आसाममधील नगावचे खासदार देवाशिष शर्मा शपथ घेतील. पुढे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि अमित शाह अनुक्रमे परिसीमन विधेयक, 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक, 2026 मागे घेण्याचे प्रस्ताव मांडतील. त्यानंतर ‘द डिलिमिटेशन (सेकंड) बिल, 2026’, ‘द युनियन टेरिटरीज लॉज (अमेंडमेंट) सेकंड बिल, 2026’ आणि संविधान (132 वी दुरुस्ती) विधेयक, 2026 मांडली जाण्याची शक्यता आहे. ही विधेयके त्याच दिवशी मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने सोमवारचे लोकसभेचे कामकाज अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us