खालापूर येथील एन.डी.स्टुडिओमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
Flag hoisting by Prashant Sajanikar : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध एन.डी. स्टुडिओमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू, लेखाधिकारी महेश भांगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्टुडिओतील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी आणि राष्ट्रीय भावनेने भारावून गेला होता.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रशांत साजणीकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या विकासात कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी एन.डी. स्टुडिओसारख्या जागतिक दर्जाच्या चित्रीकरण केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
हायड्रोजन ट्रेनपासून सौरऊर्जेपर्यंत; लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली देशाच्या प्रगतीची कहाणी
तसेच महाराष्ट्राला चित्रपट, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रात अधिक सक्षम बनवण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. नवोदित कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. राष्ट्रनिर्मितीत प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असून आपल्या कार्यातून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
देशभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक जाणीव यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे एन.डी. स्टुडिओ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.