खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर, पोलिस भरतीच्या सरावासाठी राज्यातील मैदाने मोफत
महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने पोलिस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
Grounds across the state to be made available free : राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने पोलिस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, या निर्णयामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा फायदा होणार आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘मिशन खाकी’ अंतर्गत या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. उमेदवारांच्या मेहनतीला योग्य पायाभूत सुविधांची जोड मिळावी आणि पोलिस दलात सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होण्यास मदत व्हावी, यासाठी त्यांनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यभरातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी ‘मिशन खाकी’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी विविध भागांतील तरुणांशी संवाद साधला. यावेळी सरावासाठी योग्य मैदाने उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले होते.
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड! पंढरपूरमध्ये 20 मिनिटे ताटकळले, अखेर रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
मैदानांची उपलब्धता ही भरतीच्या तयारीतील सर्वात महत्त्वाची गरज असल्याचे लक्षात घेऊन योगेश कदम यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला. शिंदे यांनी या मागणीची दखल घेत निर्णय मार्गी लावल्याचे कदम यांनी सांगितले. या निर्णयामुळे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने व क्रीडांगणे तसेच त्यांच्या व्यवस्थापनाखाली असलेली मैदाने पोलिस भरतीच्या उमेदवारांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना सरावाची परवानगी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सकाळी 5 ते 9 किंवा सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत मैदानांचा वापर करता येणार आहे.
नाना पटोले थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण
केवळ मैदाने उपलब्ध करून देण्यापुरता हा निर्णय मर्यादित नसून, उमेदवारांसाठी आवश्यक सुविधाही पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरावासाठी स्वच्छ आणि सुरक्षित मैदाने, क्रीडांगणे तसेच धावपट्ट्या तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय सरावासाठी येणाऱ्या तरुणांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारांची सोय करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे आणि मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागांतील उमेदवारांना सरावासाठी आवश्यक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे खासगी मैदानांचा वापर करणे शक्य नसलेल्या तरुणांनाही आता मोठा दिलासा मिळणार आहे.