मोठी बातमी! उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार; एकजणाचा जागीच मृत्यू, हल्लेखोर फरार
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी फरार.
Ulhasnagar Firing : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (Firing) रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबाराची घटना घडली असून, यात हरीश गझवानी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी दोन राउंड फायर केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा संशय आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबारात हरीश गजवानी यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
देशातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारची मोहीम; 13 हजारांहून अधिक जणांना मदत
प्राथमिक माहितीनुसार, हरीश गजवानी हे कॅम्प क्रमांक 4 परिसरात असताना हल्लेखोर त्यांच्या जवळ आले. त्यानंतर त्यांनी पिस्तूल काढून गजवानी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. गजवानी गंभीर जखमी होऊन घटनास्थळी कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर गर्दीचा फायदा घेत पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ही घटना जुन्या वैमनस्यातून घडली की आर्थिक व्यवहार अथवा गँगवॉरशी संबंधित आहे, यासह विविध शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील दुकाने आणि इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. तसेच, आरोपींचा माग काढण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. अद्याप हल्लेखोरांची ओळख आणि हत्येमागील कारण स्पष्ट झालेलं नाही.