नीट निकाल प्रकरणी उच्च न्यायालयाचे एनटीएला समन्स, गुणांत तफावत आढळल्याने उत्तरपत्रिका सादर करण्याचे आदेश

नीट 2026 च्या निकालानंतर गंभीर आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (82)

High Court summons NTA : संपूर्ण देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने पुन्हा नीट परीक्षा निकाल जाहीर केला. मात्र, पुनर्परीक्षेनंतरही निकालातील कथित तफावतीमुळे काही विद्यार्थ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

बीड जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी नीट 2026 च्या निकालानंतर गंभीर आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, त्यांच्या ओएमआर शीट आणि अधिकृत उत्तरसूचीचा आधार घेतल्यास अपेक्षेपेक्षा खूपच जास्त गुण मिळायला हवे होते. मात्र स्कोअरकार्डवर अत्यंत कमी गुण दाखवण्यात आले.

याचिकेनुसार, एका विद्यार्थ्याला सुमारे 522 गुण अपेक्षित असताना केवळ 95 गुण, तर दुसऱ्या विद्यार्थिनीला 702 हुन अधिक गुण अपेक्षित असताना अवघे 87 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या तफावतीमुळे एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपिस्थत करण्यात आले आहे. या प्रकरणावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने एनटीएला नोटीस बजावत दोन्ही विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका आणि संबंधित कागदपत्रे एका आठवड्याच्या आत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचे वकील महेंद्र पंडितराव गंडले यांनी ही माहिती दिली.

‘राजीनामा नको, मोदी, शाहांना बदलून टाकणार’; भर पावसात आंबेडकर मुंबईच्या रस्त्यावर, राज्यात कडकडीत बंद

दरम्यान, 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या री-नीट युजी 2026 च्या निकालानंतर देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा होत असताना, बीडमधील शुभम गवतेच्या कुटुंबासाठी हा निकाल मोठा धक्का ठरला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, ओएमआर शीट आणि अधिकृत उत्तरसूचीची पडताळणी केल्यानंतर शुभमला सुमारे 522 गुण मिळतील, अशी त्यांना खात्री होती. मात्र निकालात केवळ 95 गुण दिसताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.

विद्यार्थ्यांच्या आईने सांगितले की, मुलाने रात्रंदिवस मेहनत घेतली, अनेकदा दोन-तीन तासांपेक्षाही कमी झोप घेत अभ्यास केला, आजारी असताना देखील तयारी थांबवली नाही. तरी देखील निकालाने वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. वडिलांनी देखील ओएमआर शीट आणि अधिकृत उत्तरसूचित मोठी तफावत आढळल्याचे दावा करत न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे नीट पुनर्परीक्षेच्या निकालाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, आता एनटीए न्यायालयात कोणते स्पष्टीकरण देते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

follow us