‘प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो’; जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत
Javed Akhtar on Lord Ram: गीतकार जावेद अख्तरांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले. 'रामायण भाग 1' चित्रपटावरही प्रतिक्रिया दिली.
Javed Akhtar on Lord Ram: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण भाग 1’ (Ramayana) हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाबाबत ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हा चांगला चित्रपट असल्याचे सांगत तो पाहणार असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, यावेळी प्रभू श्रीराम यांच्याविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्याने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ‘प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो. राम म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार आहे,’ असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
जावेद अख्तर यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल काय सांगितलं?
जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या ‘पल पल है भारी’ या गाण्यातील ‘मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं’ या ओळींचा संदर्भ देत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या ओळी अनेकांच्या मनाला भिडल्याचे सांगत त्यांच्या लेखनामागील विचारांबद्दलही विचारणा झाली.
यावर उत्तर देताना जावेद अख्तर यांनी आपण चांगले कवी असल्यामुळे आपल्या ओळी लोकांना आवडल्या, असे मिश्किलपणे म्हटले. त्यानंतर त्यांनी अब्दुल रहीम खानखाना यांचा एक दोहा ऐकवला.
‘रहिमन मुश्किल आ पडी, टेढ़े दोऊ काम,
सीधे से जग ना मिले, उलटे मिलें ना राम.’
या दोह्याचा संदर्भ देत त्यांनी प्रभू श्रीराम यांच्याकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा विचार करायला हवा, असे सांगितले.
‘राम म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग’
प्रभू राम हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून ते आदर्श आणि जीवन जगण्याची पद्धत दर्शवतात, असे जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले. रामाच्या विचारांवर आणि जीवनमूल्यांवर आधारित लेखन केले, तर ते लोकांच्या मनाला नक्कीच भावते, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा एक आदेश अन् 50 हजारांहून अधिक महिला सरपंचांना टार्गेट करणारे रॅकेट उघड!
आपले हे मत ऐकून काही लोक नाराज होऊ शकतात, याची जाणीव असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम आहेत. त्या व्यक्तीचा धर्म कोणताही असला, तरी रामाचा विचार प्रत्येक भारतीयाशी जोडलेला आहे. राम म्हणजे जीवन जगण्याची कला आणि आदर्श असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, ‘रामायण भाग 1’ या चित्रपटाबाबतही जावेद अख्तर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. हा चांगला चित्रपट असल्याचे सांगत आपण तो पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे.