ह. भ. प. दौलत महाराज सातपुते यांचं टोकाचं पाऊल, भोकरदनमध्ये मठात गळफास घेऊन आयुष्य संपवलं
Daulat Satpute Maharaj Suicide : भोकरदन तालुक्यातील मठात कीर्तनकार दौलत महाराजांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
Daulat Satpute Maharaj Suicide : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी गावात कीर्तनकार ह.भ.प. दौलत सातपुते महाराज (वय 41) यांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास असलेल्या महाराजांचा मृतदेह सकाळी खोलीत आढळून आला. रात्री उशिरापर्यंत गावात कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना मार्गदर्शन करणारे महाराज सकाळी मृतावस्थेत आढळल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दौलत सातपुते महाराज हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील मूळ रहिवासी होते. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ते भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे वास्तव्यास होते. पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठ हे त्यांचे निवासस्थान होते. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक विचारांचा प्रसार करत समाजप्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले होते. विविध सामाजिक आणि धार्मिक विषयांवर ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत असल्याने परिसरातील भाविकांशी त्यांचा जवळचा संपर्क निर्माण झाला होता.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
घटनेच्या आदल्या दिवशी रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत महाराजांचे गावात कीर्तन झाले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते नेहमीप्रमाणे मठात परतले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ उलटूनही ते खोलीबाहेर न आल्याने दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना शंका आली. यानंतर खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता महाराज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. महाराजांनी एवढे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्री कीर्तनातून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांच्या निधनाच्या वृत्ताने अवघडराव सावंगी आणि परिसरातील भाविकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.