एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा, चिनी हेरगिरीच्या संशयाने अमेरिकेत खळबळ
Jensen Huang China Spy Allegations : एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांच्या कथित प्रेमप्रकरणाला आता चिनी हेरगिरीच्या संशयाची किनार लाभली आहे.
Jensen Huang China Spy Allegations : जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनसन हुआंग यांच्याशी संबंधित एका कथित प्रेमप्रकरणाने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. एका महिलेसोबत असलेल्या त्यांच्या संबंधांची चर्चा सुरू असतानाच ही महिला चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले आहे. एलिस हुआंग असे या महिलेचे नाव असून, एनव्हिडियाच्या महत्त्वाच्या तांत्रिक माहितीपर्यंत पोहोच मिळवण्यासाठी चीनने तिचा वापर केल्याचा दावा करण्यात येत आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. जेनसन हुआंग यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशातून पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली दिली असून, आपल्या वागण्यामुळे पत्नी आणि मुलांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, एलिस हुआंग यांच्यासोबतच्या संबंधांचा किंवा हेरगिरीच्या आरोपांचा त्यांनी या संदेशात थेट उल्लेख केलेला नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आहे.
द न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकन गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या कथित प्रकरणाचा तपशील प्रसिद्ध केला होता. त्यानुसार, एलिस हुआंग चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असल्याचा संशय असून, एनव्हिडियाचे प्रमुख जेनसन हुआंग यांच्याशी जवळीक निर्माण करून कंपनीच्या धोरणात्मक माहितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या महिलेवर अमेरिकन यंत्रणांकडून बराच काळ नजर ठेवण्यात आली होती. मात्र, या आरोपांना अद्याप सार्वजनिकरीत्या ठोस पुराव्यांची जोड मिळालेली नाही.
अमेरिकन तपास यंत्रणांना एलिस हुआंग एका अमेरिकन नागरिकाच्या सतत संपर्कात असल्याचे तपासादरम्यान आढळले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रक्रियेत तो नागरिक दुसरा कोणी नसून एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग असल्याचे समोर आल्याचा दावा वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. या संबंधांची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सुमारे वर्षभरापूर्वी देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील प्रत्येक दुवा तपासण्यावर अमेरिकन यंत्रणांचा भर आहे.
या संपूर्ण प्रकरणात सिंगापूरस्थित मेगास्पीड या डेटा सेंटर कंपनीची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. एलिस हुआंग या कंपनीच्या व्यवस्थापनाशी संबंधित होत्या आणि त्यांनी स्वतःला कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही संबोधल्याचे सांगण्यात आले आहे. मेगास्पीड ही एनव्हिडियाची व्यावसायिक भागीदार असून, आशियाई बाजारपेठेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय क्षमता पुरवण्याच्या व्यवसायात तिचा सहभाग आहे. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून एनव्हिडियाच्या तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती चीनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास केला जात आहे.
मेगास्पीड कंपनीने एनव्हिडियाकडून मोठ्या प्रमाणात प्रगत संगणकीय चिप्स खरेदी केल्याचे वृत्त आहे. या चिप्सचा वापर चीनमधील कंपन्यांना करून देण्यात आला का आणि त्यासाठी अमेरिकेने लागू केलेल्या निर्यात निर्बंधांना बगल देण्यात आली का, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी यापूर्वीही या कंपनीच्या व्यवहारांची छाननी केली होती. मात्र, मेगास्पीडने बेकायदेशीररीत्या चिप्स चीनमध्ये पाठवल्याचे आरोप फेटाळले आहेत. कंपनीने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
जेनसन हुआंग आणि एलिस हुआंग यांना सर्वप्रथम जून २०२४ मध्ये एकत्र पाहिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर दोघांच्या भेटी आणि व्यावसायिक कार्यक्रमांमधील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मात्र, त्यांची पहिली भेट नेमकी कधी झाली आणि वैयक्तिक संबंध कधी निर्माण झाले, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. दुसरीकडे, अमेरिकन यंत्रणांनी एलिस यांच्या चीनमधील संपर्कांची आणि व्यावसायिक व्यवहारांची तपासणी सुरू ठेवल्याचे वृत्त आहे. या संबंधांचा वापर करून संवेदनशील माहिती मिळवण्यात आली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणाची व्याप्ती आता सिंगापूरपर्यंत पोहोचली आहे. एनव्हिडियाच्या प्रगत चिप्सची चीनमध्ये निर्यात करण्यासाठी मेगास्पीडने अमेरिकेच्या निर्बंधांना चुकवण्याचा प्रयत्न केला होता का, याची सिंगापूर सरकारकडून चौकशी सुरू आहे. मात्र, सिंगापूर सरकारने एलिस हुआंग या स्वतः तपासाच्या कक्षेत असल्याचे नाकारले आहे. दुसरीकडे, चीननेही तिच्यावरील हेरगिरीचे आरोप फेटाळले आहेत. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी हे आरोप निराधार आणि चीनची बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणाचा परिणाम एनव्हिडियाच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रतिमेवरही होण्याची शक्यता आहे. जेनसन हुआंग यांच्याशी संबंधित वृत्त समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एका व्यवहाराच्या दिवशी कंपनीचे बाजारमूल्य सुमारे १९० अब्ज डॉलरने कमी झाल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे हुआंग यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. याशिवाय, कंपनीने महत्त्वाची माहिती गुंतवणूकदारांपासून लपवली, असा आरोप करत काही भागधारकांनी एनव्हिडिया आणि जेनसन हुआंग यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एनव्हिडियाच्या अत्याधुनिक चिप्सचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, लष्करी संशोधन आणि अत्याधुनिक संगणकीय प्रणालींमध्ये केला जातो. त्यामुळे कंपनीच्या तंत्रज्ञानाची माहिती परदेशी गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. चीनला अत्याधुनिक चिप्स मिळाल्यास त्याच्या लष्करी आणि पाळत ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते, अशी भीती अमेरिकेतील धोरणकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेने २०२२ पासून चीनला प्रगत सेमीकंडक्टर चिप्स आणि संबंधित तंत्रज्ञान मिळण्यावर विविध निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा उद्देश अमेरिकेचे तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्व कायम ठेवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करणे हा आहे. मात्र, या धोरणाचा फटका एनव्हिडियाच्या चीनमधील व्यवसायालाही बसला आहे. जेनसन हुआंग यांनी यापूर्वी एका मुलाखतीत चीनच्या बाजारपेठेत एनव्हिडियाचा वाटा एकेकाळी जवळपास ९५ टक्के होता, मात्र निर्बंधांमुळे तो आता जवळपास शून्यावर आल्याचे सांगितले होते.
दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यावसायिक संबंध पूर्णपणे बिघडू नयेत, यासाठी जेनसन हुआंग सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. चीनच्या मोठ्या बाजारपेठेत एनव्हिडियाला पुन्हा व्यवसाय करण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी अमेरिकन सरकारकडे परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता त्यांच्या वैयक्तिक संबंधांशी जोडल्या गेलेल्या हेरगिरीच्या संशयामुळे या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीची स्वतंत्र चौकशी, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा तपास आणि सिंगापूरमधील चौकशी यातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.