पाकिस्तान भिकेला लागला! बाजार बंदीसह लग्नात ‘वन डिश’चा नियम; वाचा, निर्बंधाची भलीमोठी यादी
Pakistan : 17 सप्टेंबर रोजी कॅबिनेट डिव्हिजननं जारी केलेल्या आदेशानुसार बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री 9 वाजता बंद करावे लागणार आहेत.
पाकिस्तान सरकारनं वाढता इंधन (Pakistan) खर्च आणि ऊर्जा पुरवठ्याबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर नव्या काटकसरीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी कॅबिनेट डिव्हिजननं जारी केलेल्या आदेशानुसार बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री 9 वाजता बंद करावे लागणार आहेत. लग्नसमारंभात ‘वन डिश’चा नियम लागू करण्यात आला असून, विवाह सभागृह आणि अन्य कार्यक्रमस्थळं रात्री 10 वाजता बंद करावी लागतील. रेस्टॉरंट, कॅफे आणि खाद्यपदार्थांची दुकानं रात्री 11 वाजता बंद करावी लागतील. मात्र, पार्सल आणि घरपोच सेवांना या निर्बंधातून वगळण्यात आलं आहे.
सरकारी खर्चावरही मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारी वाहनांसाठीच्या इंधन वाटपात 3 महिन्यांसाठी 50% कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विभागांना नवीन वाहनं खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणं वगळता टिकाऊ वस्तूंच्या खरेदीवरही निर्बंध आणण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये कर्मचारी खर्च वगळता अन्य खर्चात 5% कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लष्कर, निमलष्करी दल, कायदा-सुव्यवस्था यंत्रणा, अत्यावश्यक सेवा आणि फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या कार्यरत वाहनांना इंधन कपातीमधून वगळण्यात आलं आहे. मात्र, या विभागांतील प्रशासकीय आणि गैर-कार्यरत वाहनांवर इंधन कपातीचा निर्बंध लागू असेल. मंत्री, सल्लागार, संसद सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवरही 3 महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती आणि काही प्रशिक्षण कार्यक्रमांना यातून सूट देण्यात आली आहे.
भारत, पाकिस्तान की अमेरिका, या; देशात सर्वात स्वस्त मिळतोय iPhone 18 Pro Max
शक्य असेल तिथं अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या खर्चातून होणारे सेमिनार, परिषदा आणि प्रशिक्षण कार्यक्रमही मर्यादित करण्यात आले आहेत. परदेशी शिष्टमंडळांच्या उपस्थितीचा अपवाद वगळता सरकारी खर्चानं आयोजित करण्यात येणाऱ्या अधिकृत मेजवान्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आवश्यक मानल्या जाणाऱ्या परदेशातील कार्यक्रमांमध्ये पाकिस्तानच्या राजनैतिक मिशन्सना देशाचं प्रतिनिधित्व करता येणार आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं इंधनाच्या किमतीतही बदल केले आहेत. 18 सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात 43 पैसे कपात करून तो PKR 390.79 प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर हाय-स्पीड डिझेलच्या दरात PKR 3.47 वाढ करून तो PKR 424.92 प्रतिलिटर करण्यात आला आहे. याच्या एक दिवस आधी पेट्रोलच्या दरात PKR 6.88 आणि डिझेलच्या दरात PKR 5.62 वाढ करण्यात आली होती. पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या आणि इंधनाच्या बाजारातील अस्थिरता वाढल्यानं पाकिस्ताननं जुलैपासून पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींचा दररोज आढावा सुरू केला आहे.
पाकिस्तान सरकारनं पात्र मोटारसायकल, रिक्षा आणि छोट्या कारच्या मालकांसाठी प्रतिलिटर PKR 100 इंधन अनुदानाची योजना यापूर्वीच सुरू केली आहे. या अनुदानाला मासिक मर्यादा लागू आहेत. पाकिस्तान आपल्या ऊर्जेच्या गरजेचा मोठा हिस्सा आयातीतून भागवतो. हार्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल आणि गॅस वाहतुकीतील संभाव्य अडथळे तसेच सौदी अरेबिया आणि येमेनमधील संघर्षामुळं लाल समुद्रातील जहाज वाहतुकीला निर्माण झालेला धोका यामुळे इंधन आणि एलएनजी पुरवठ्याबाबतची चिंता वाढली आहे.
यावर्षी पाकिस्ताननं दुसऱ्यांदा मोठी काटकसरीची मोहीम हाती घेतली आहे. मार्चमध्येही इंधनाचा वापर कमी करण्यासाठी शाळा तात्पुरत्या बंद करणं, विद्यापीठांचे ऑनलाइन वर्ग घेणं, सरकारी कार्यालयांतील उपस्थिती कमी करणं आणि अत्यावश्यक नसलेली सरकारी वाहनं बंद ठेवण्यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.