इन्स्टाग्राम पोस्ट, अनफॉलो आणि हटवलेले फोटो; पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्या नात्यात नेमके काय घडले?
पोस्टमध्ये पृथ्वी शॉचे नाव घेतलेले नसले, तरी गेल्या काही दिवसांपासून दोघांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.
Prithvi Shaw back in the spotlight due to Akriti Agarwal’s post : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेटचे उज्वल भविष्य म्हणून पाहिल्या गेलेल्या पृथ्वी शॉच्या कारकिर्दीवर त्याच्या मैदानाबाहेरील घडामोडींचा देखील परिणाम झाल्याचे मानले जाते. यावर्षी मार्च महिन्यात त्याने आकृती अग्रवाल हिच्यासोबत साखरपुडा केला होता. मात्र, आता या दोघांचा साखरपुडा मोडल्याचा चर्चांना जोर आला आहे. अद्याप पृथ्वी किंवा आकृती यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, आकृती अग्रवालने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने पृथ्वी शॉचे नाव थेट घेतलेले नसले, तरी गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. अशातच आकृतीच्या पोस्टमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आकृतीने शेअर केलेल्या संदेशात तिने वारंवार फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तिच्या आणि पृथ्वीच्या नात्यातील मतभेदांमुळे साखरपुडा मोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
याशिवाय, आकृतीने पृथ्वी शॉला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचे तसेच साखरपुड्याशी संबंधित सर्व छायाचित्रे आपल्या खात्यावरून हटवल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. आकृतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्यासोबत अनेक वेळा विश्वासघात झाला, तरीही मी याबाबत काही बोलले नाही. पुढे जाण्याचा प्रयत्न करूनही आजही घडलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. सर्व अफवा खऱ्या आहेत. सोशल मीडियावर जे काही दिसत आहे, तेच वास्तव आहे.
दुसरा सामना 7 वाजता, तिसरा 10 वाजता; भारत-इंग्लंड टी-20 मालिकेच्या वेळेत का झाला बदल?
तिने या संदेशात कुठेही पृथ्वी शॉ किंवा त्यांच्या साखरपुड्याचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, आधीपासून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर तिची ही पोस्ट साखरपुडा तुटल्याच्या वृत्ताशी जोडली जात आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरी प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सेजल पवार या तरुणीने देखील एका पॉडकास्टमध्ये पृथ्वी शॉ आपल्याला मेसेज करत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या घटनेचा देखील अप्रत्यक्ष संबंध या प्रकरणाशी लावला जात आहे. तशी चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू आहे.
पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2018 जिंकला होता. त्यानंतर त्याच्याकडे भारतीय क्रिकेटचा भावी स्टार म्हणून पाहिले जात होते. कसोटी पदार्पणात शतक झळकावून त्याने दमदार सुरुवात केली होती. मात्र, नंतरच्या काळात खराब फॉर्ममुळे त्याला भारतीय संघाबाहेर जावे लागले. याशिवाय, डोपिंग प्रकरणात त्याच्यावर बंदीची कारवाईही झाली होती. तसेच एका तरुणीसोबत झालेल्या वादामुळेही तो चर्चेत आला होता.