अण्णा हजारे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या सदिच्छा; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतली भेट
अण्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशा सदिच्छाही प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केल्या.
Ram Shinde met Anna Hazare : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ समाजसेवक तथा पद्मभूषण अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांच्या सध्याच्या आरोग्यस्थितीबाबत डॉक्टर तसेच संबंधितांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. अण्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशा सदिच्छाही प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केल्या.
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात यावी, अशी भावना व्यक्त करत प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या आरोग्याबाबत आपुलकीने संवाद साधला. अण्णा हजारे यांचे संपूर्ण आयुष्य समाजहित आणि देशहितासाठी समर्पित राहिले असून, त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर निःस्वार्थ सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत महाराष्ट्रासह देशभरातील कार्यकर्ते, नागरिक आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये विशेष आस्था असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामविकासापासून भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापर्यंत आणि सामाजिक प्रबोधनापासून स्वच्छता व लोकसहभागाच्या चळवळीपर्यंत अण्णा हजारे यांनी विविध क्षेत्रांत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विशेषतः ग्रामविकासाच्या माध्यमातून गावांचा कायापालट घडवून आणताना त्यांनी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून विकासाची दिशा निश्चित करण्याचा त्यांचा आग्रह आणि सार्वजनिक जीवनात पारदर्शकता व प्रामाणिकपणा असावा, यासाठी त्यांनी केलेला संघर्ष समाजाला सातत्याने प्रेरणा देत आला आहे.
तुम्हाला मान्य नसेल तर पाकिस्तानात जा, सिद्धेश कदमांचा अमित ठाकरेंना थेट इशारा
साधी राहणी, उच्च विचारसरणी, निःस्वार्थ सेवाभाव आणि समाजहितासाठी संघर्ष करण्याची अण्णांची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही व्यक्तिगत अपेक्षेशिवाय समाजासाठी कार्य करण्याचा त्यांनी आयुष्यभर जपलेला ध्यास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या विविध आंदोलनांमुळे सार्वजनिक जीवनात जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.
अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करता आली, हा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा क्षण असल्याची भावना प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली. अण्णांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहिले आहेत. समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला अण्णांच्या जीवनकार्यामधून निःस्वार्थपणे काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
Video : जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मसुदा दिलाय, मंत्री विखे पाटील यांनी आकडेवारीच मांडली
अण्णा हजारे यांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक जीवनातून समाजसेवा ही केवळ भूमिका नसून ती एक निरंतर जबाबदारी असल्याचा संदेश दिला आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असावी तसेच विकास प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, या मूल्यांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे कार्य आणि विचार आजही समाजजीवनाला दिशा देणारे ठरत असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी नमूद केले.
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांच्या विचारांचे व मार्गदर्शनाचे बळ समाजाला यापुढेही दीर्घकाळ मिळत राहावे, अशी मनःपूर्वक सदिच्छा प्रा. राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.