‘इंडियाज गॉट लेटंट’मुळे समय रैना पुन्हा वादात; काश्मिरी पंडितांवरील कथित विनोदावर राम कदम आक्रमक

समय रैना आणि स्टॅन्ड-अप कॉमेडियन शेरॉन वर्मा यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 30T131106.619

Samay Raina in controversy again due to ‘India’s Got Latent’ : स्टॅन्ड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये काश्मिरी पंडित आणि बिहारी लोकांबाबत करण्यात आलेल्या कथित विनोदांमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. समय रैना आणि स्टॅन्ड-अप कॉमेडियन शेरॉन वर्मा यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर भाजप आमदार राम कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समय रैनावर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडित समाजाने मोठ्या वेदना आणि विस्थापनाचा सामना केला असून त्याबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे स्वीकारार्ह नसल्याचे कदम यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी समय रैनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाल्याचा उल्लेखही या वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे.

‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात समय रैनासोबत अर्चना पूरण सिंह प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. याच एपिसोडमध्ये स्टॅन्ड-अप कॉमेडियन शेरॉन वर्मादेखील सहभागी झाली होती. शेरॉन ही बिहारची असल्याचा संदर्भ घेत तिची ओळख करून देताना समय रैनाने तिच्यावर विनोद केला. ही बिहारची आहे आणि इतकी बिहारी आहे की तिला ‘इबोला’ म्हणजे कुणीतरी काहीतरी बोललं, असं वाटतं, असे समय म्हणाला. त्यावर शेरॉननेही समयला प्रत्युत्तर देत, समय इतका काश्मिरी आहे की त्याला स्वतःवर दगड भिरकवून घ्यायला आवडतं, अशी टिप्पणी केली. यानंतर दोघांमध्ये बिहार आणि काश्मीरच्या संदर्भाने विनोदांची जुगलबंदी सुरू झाली.

प्रमाणपत्र रद्द करून मराठ्यांच्या उरावर नाचण्याचं काम केलं जातंय, मनोज जरांगेची सरकारवर घणाघाती टीका

याच संवादादरम्यान समय रैनाने शेरॉनला उद्देशून, शेरॉन ही अशी बिहारी आहे जी नोकरीच्या शोधात मुंबईत आली होती… जस्ट बिहारी थिंग्स, अशी टिप्पणी केली. त्यावर शेरॉनने लगेच, किमान मी स्वतःच्या मर्जीने माझं राज्य सोडलं, असे प्रत्युत्तर दिले. या संवादानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, यातील काश्मीर आणि राज्य सोडण्यासंदर्भातील टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर टीका होऊ लागली. समय रैना हा मूळचा काश्मिरी पंडित कुटुंबातील आहे. काश्मिरी पंडितांचे विस्थापन हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे या विनोदांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या प्रकरणाची दखल घेत भाजप आमदार राम कदम यांनी समय रैनावर टीका केली. काहीही बोलून फुकटची प्रसिद्धी मिळवणे ही काहींची प्रवृत्ती बनली आहे. प्रसिद्ध होणे हा त्यांचा एकमेव हेतू असतो. सनातन हिंदू धर्माच्या देवी-देवता आणि काश्मिरी पंडित हे उपहासाचे विषय असू शकत नाहीत, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आधी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह बोलायचे आणि नंतर माफी मागायची, त्यातून देशभरात फुकटची प्रसिद्धी मिळते, अशा शब्दांत राम कदम यांनी नाराजी व्यक्त केली.

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा उल्लेख करत कदम यांनी या प्रकारच्या विनोदावर आक्षेप घेतला. काश्मिरी पंडित हे या देशाचा अविभाज्य भाग आहेत. दहशतवादी आणि पाकिस्तानच्या आयएसआयच्या कटामुळे त्यांना आपली घरे सोडून विस्थापित होण्यास भाग पाडले गेले. एवढ्या वेदना आणि अत्याचाराला सामोरे गेलेल्या समाजाविरुद्ध अशा अपमानजनक भाषेचा वापर सुसंस्कृत समाजात स्वीकारार्ह नाही. हे पूर्णपणे निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे, असे राम कदम म्हणाले. अशा प्रकारची टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीने देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

गोंदिया-गडचिरोलीला यलो अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांतही सरींचा अंदाज

कलाकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलताना राम कदम यांनी कलेलाही काही मर्यादा असल्याचे म्हटले. आम्ही कलाकारांच्या प्रतिभेचा आदर करतो, पण त्यालाही काही मर्यादा असतात. जर कोणी कोणाच्या श्रद्धेला, भावनांना आणि विश्वासाला दुखावत असेल, तर अशा कलेला कला म्हणता येणार नाही. मग तो समय रैना असो किंवा इतर कोणताही कलाकार, असे कदम म्हणाले. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक एखाद्या समाजाला किंवा विषयाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमागे प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू असल्याचे सांगत त्यांनी हा ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याची टीका केली.

एकीकडे समय रैना आणि शेरॉन वर्मा यांच्यातील संवाद हा कॉमेडीचा भाग असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात असले, तरी दुसरीकडे काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि बिहारी नागरिकांबाबत वापरण्यात आलेल्या संदर्भांवरून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच भाजप आमदार राम कदम यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत माफीची मागणी केल्याने ‘इंडियाज गॉट लेटंट’चा हा एपिसोड आणि समय रैना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

follow us