सलमान खानवरील हल्ल्याचा कट फसला, टायगर श्रॉफचा ठावठिकाणा रिक्षाचालकाने सांगितला? हल्लेखोरांनी प्लॅनच बदलला!
Tiger Shroff Firing:सलमान खानसह बॉलिवूड कलाकारांच्या घरांची रेकी केली नंतर रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीमुळे टायगर श्रॉफ निशाण्यावर आला.
Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या प्रकरणात एका रिक्षाचालकाने हल्लेखोरांना दिलेली माहिती महत्त्वाची ठरल्याचे समोर आले आहे. टायगर दर रविवारी जुहू येथील एका मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी येतो, अशी माहिती रिक्षाचालकाने बिश्नोई गँगच्या हल्लेखोरांना दिल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. याच माहितीच्या आधारे हल्लेखोरांनी टायगरच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाबाबत NDTV ने वृत्त प्रकाशित केले आहे.
आधी सलमान खानवर हल्ला करण्याचा कट?
पोलीस सूत्रांच्या दाव्यानुसार, हल्लेखोरांचे सुरुवातीचे लक्ष्य सलमान खान होता. मात्र, त्याच्यावरील हल्ल्याचा कट यशस्वी न झाल्यानंतर दुसऱ्या अभिनेत्यावर हल्ला करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हल्लेखोरांनी अमिताभ बच्चन, आमीर खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांचीही पाहणी केली होती.
या अभिनेत्यापैकी कोणाला हल्ला करणे सोपे ठरेल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, अमिताभ बच्चन, आमीर खान किंवा अक्षय कुमार यांची सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला नाही, अशी माहिती आहे.
रिक्षाचालकाने सांगितला टायगरचा दिनक्रम
NDTV च्या वृत्तानुसार, हल्लेखोर मुंबईत विविध बॉलिवूड कलाकारांच्या घरांची रेकी करत होते. याचदरम्यान त्यांना एका रिक्षाचालकाकडून टायगर श्रॉफच्या दिनक्रमाची माहिती मिळाली. टायगर दर रविवारी जुहू परिसरातील एका मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी येतो, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर टायगर त्यांच्या रडारवर आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले.
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी आरोपी या मैदानाजवळ गेले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची उपस्थिती दिसल्याचे सांगितले जात आहे. त्या दिवशी टायगर मैदानावर आला नव्हता. त्यामुळे ही भेट हल्ल्यापूर्वी केलेल्या रेकीचा भाग असल्याचा संशय आहे.
17 ऑक्टोबरला शस्त्रे, 18 ऑक्टोबरला हल्ला
तपासातील माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी हल्लेखोरांना शस्त्रे मिळाली आणि त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पिस्तुलांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी शस्त्रे अज्ञात ठिकाणी फेकून दिल्याचा संशय असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आता या कटामागे कोण होते, हल्लेखोरांना लक्ष्याची माहिती कोणी पुरवली आणि रेकीसाठी किती जणांनी मदत केली, याचा तपास सुरू आहे. रिक्षाचालकाकडून मिळालेली माहिती हल्लेखोरांपर्यंत नेमकी कशी पोहोचली आणि त्याची या कटातील भूमिका काय होती, हे तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.
“मला कोपऱ्यात कोणी टाकलं रे…, पुढच्या वेळेस लक्षात ठेव…”; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे संतापले!
दरम्यान, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये गोळीबार करणारे तीन कथित आरोपी रेहान ऊर्फ सुक्का, हृतिक कुमार ऊर्फ रोशन आणि फूलसिंग यांचा समावेश आहे. या तिघांना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. याशिवाय, शस्त्र पुरवठ्याशी संबंधित असल्याच्या आरोपावरून कुनाल, सुमित आणि राधा व बबिता या दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे. अमृतसरमधून पिस्तूल आणि काडतुसे आणणे तसेच ती मुंबईपर्यंत पोहोचवण्यात या चौघांची भूमिका असल्याचा संशय आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा आणि हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत.