वर्षभर मुंबई पोलिसांना जमलं नाही, तुकाराम मुंढेंनी आठवड्यात करून दाखवलं, कॅन्टीनला 75 हजारांचा दंड!

वर्षभरापासून नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट खाद्यपदार्थ, अस्वच्छतेबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 31T104845.262

Tukaram Mundhe slaps a fine of 75,000 on the canteen : मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट खाद्यपदार्थ आणि अस्वच्छतेबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. मात्र, अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार पोहोचताच अवघ्या आठवडाभरात कारवाई करण्यात आली. एफडीएने कॅन्टीन चालकाला तब्बल 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

विशेष म्हणजे, वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या तक्रारीवर आठवडाभरात कारवाई झाल्याने मुंबई पोलीस दलात या कारवाईची चर्चा रंगली आहे. वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने कर्मचाऱ्यांनी थेट एफडीएकडे धाव घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी तातडीने दखल घेत कॅन्टीनमधील अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. खाद्यपदार्थ तयार करताना योग्य आणि दर्जेदार तेलाचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खाद्यतेलाच्या आतापर्यंत 1,089 तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये 80 परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच तब्बल 28,753 क्विंटल माल जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा धो धो…, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

अन्न व्यावसायिकांनी विक्रीपूर्वी खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कालबाह्य अन्नपदार्थांची एकही पिशवी बाजारात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. कंपनी छोटी असो किंवा मोठी, नियम सर्वांसाठी समान आहेत, असा स्पष्ट इशाराही मुंढे यांनी दिला. एफडीएचे उद्दिष्ट केवळ कारवाई करणे नसून अन्न व्यवसायात नियमांचे पालन सुनिश्चित करणे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. हॉटेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, शालेय खाद्यपदार्थ अशा विविध क्षेत्रांसाठी आतापर्यंत 22 कम्प्लायन्स ऑर्डर जारी करण्यात आल्या आहेत.

याच अंतर्गत कालबाह्य, खराब आणि नुकसानग्रस्त अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीसंदर्भात ‘एक्स्पायर्ड, रिटर्न अँड डॅमेज फूड’ ही नवी ऑर्डर जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कालबाह्य किंवा खराब झालेले अन्नपदार्थ पुन्हा वापरात आणले जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. संबंधित कंपनीला अन्नपदार्थ पूर्णपणे नष्ट केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

एकीकडे मुंबई पोलिसांच्या कॅन्टीनवर कारवाई, तर दुसरीकडे भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्या अन्न व्यावसायिकांना स्पष्ट इशारा… अशा दुहेरी भूमिकेतून तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.

follow us