व्हॉयेजर-1: 49 वर्षांचा अंतराळ प्रवास; पृथ्वीपासून 25.9 अब्ज किलोमीटर दूर, तरीही नासाशी संपर्कात कसं?
49 वर्षांच्या अंतराळ प्रवासानंतर व्हॉयेजर-1 पृथ्वीपासून 25.9 अब्ज किलोमीटर दूर पोहोचलं असून, आजही त्याचा नासाशी संपर्क कायम आहे.
49 Years in Space! NASA’s Spacecraft Reaches 25.9 Billion Kilometres from Earth: पृथ्वीवरून तब्बल 49 वर्षांपूर्वी निघालेलं एक अंतराळयान आजही अंतराळात प्रवास करत आहे. विशेष म्हणजे, हे यान पृथ्वीपासून इतकं दूर पोहोचलं आहे की, सूर्यापासून निघणाऱ्या प्रकाशालाही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 24 तास लागतात. पृथ्वीपासून तब्बल 25.9 अब्ज किलोमीटर अंतरावर असलेल्या या यानाचा आजही नासाशी संपर्क आहे. हे अंतराळयान म्हणजे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचं व्हॉयेजर-1 (Voyager 1). 18 नोव्हेंबर रोजी नासाकडून समोर आलेल्या माहितीनुसार, व्हॉयेजर-1 ने एक लाइट डे म्हणजेच प्रकाश एका दिवसात जेवढं अंतर पार करतो, तेवढं अंतर गाठलं आहे.
लाइट डे म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. प्रकाश एका सेकंदात जवळपास 3 लाख किलोमीटर अंतर पार करतो. हाच प्रकाश सलग 24 तास प्रवास करत राहिला, तर तो जेवढं अंतर पार करेल, त्याला एक लाइट डे असं म्हणतात. हेच अंतर पार करण्यासाठी व्हॉयेजर-1 ला तब्बल 49 वर्षं लागली आहेत. मात्र, या यानाची कामगिरी केवळ अंतराचा विक्रम करण्यापुरती मर्यादित नाही. या यानाने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. व्हॉयेजर-1 आणि त्याच्यासोबत पाठवण्यात आलेल्या व्हॉयेजर-2 या दोन्ही यानांचा प्रवास नेमका कसा सुरू झाला, त्यांनी अंतराळात काय पाहिलं आणि पृथ्वीची अशी कोणती छायाचित्रं पाठवली, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीला आपल्या अस्तित्वाचा वेगळाच अर्थ समजला, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशा ग्रहांबद्दल माणसाला सुरुवातीपासूनच कुतूहल राहिलं आहे. या ग्रहांची रचना कशी आहे, सूर्याचा प्रभाव नेमका कुठपर्यंत आहे आणि आपल्या सौरमालेच्या बाहेर काय आहे, असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांसमोर होते. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने व्हॉयेजर मोहीम आखली. या मोहिमेत व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 अशी दोन अंतराळयानं पाठवण्यात आली. या यानांमध्ये वैज्ञानिक कॅमेरे आणि विविध संशोधन उपकरणं बसवण्यात आली होती. त्यांच्या मदतीने अंतराळातील ग्रहांचा अभ्यास करणं आणि त्यांची माहिती पृथ्वीवर पाठवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
मात्र, ही दोन्ही यानं 1977 मध्येच का पाठवण्यात आली, असा प्रश्न निर्माण होतो. यामागे एक विशेष वैज्ञानिक गणित होतं. त्या काळात शास्त्रज्ञांनी गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला होता. प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण असतं. अंतराळयानाला एका ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून पुढच्या प्रवासासाठी अतिरिक्त गती मिळवता येते. या तंत्राच्या मदतीने एका ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून यानाला दुसऱ्या ग्रहाच्या दिशेने पुढे पाठवता येतं. शास्त्रज्ञांनी या ग्रहांच्या स्थितीचं गणित मांडलं आणि त्यातून 1977 हे वर्ष या मोहिमेसाठी योग्य असल्याचं समोर आलं. त्यानुसार गुरू आणि शनीच्या अभ्यासासाठी व्हॉयेजर-1, तर युरेनस आणि नेपच्यूनच्या अभ्यासासाठी व्हॉयेजर-2 ही यानं पाठवण्यात आली.
व्हॉयेजर-1 हे नाव असलं, तरी प्रत्यक्षात व्हॉयेजर-2 आधी अंतराळात पाठवण्यात आलं होतं. व्हॉयेजर-2 ऑगस्ट 1977 मध्ये लॉन्च झालं, तर व्हॉयेजर-1 हे 5 सप्टेंबर 1977 रोजी लॉन्च करण्यात आलं. आधी लॉन्च झालेल्या यानाला व्हॉयेजर-2 आणि नंतर लॉन्च झालेल्या यानाला व्हॉयेजर-1 असं नाव देण्यामागे कारण होतं. व्हॉयेजर-1 हे यान व्हॉयेजर-2 पेक्षा अधिक वेगाने प्रवास करेल, त्यामुळे ते पुढे निघून जाईल आणि त्याच्याकडून आधी माहिती मिळेल, अशी शास्त्रज्ञांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसंच घडलं. 15 डिसेंबर 1977 रोजी व्हॉयेजर-1 ने व्हॉयेजर-2 ला मागे टाकलं. म्हणजेच लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच ते आपल्या आधी पाठवलेल्या यानाच्या पुढे निघून गेलं.
यानंतर दोन्ही यानांचा अंतराळातील प्रवास सुरूच राहिला. 5 मार्च 1979 रोजी व्हॉयेजर-1 गुरू ग्रहाजवळून प्रवास करत असताना त्याने गुरू आणि त्याच्या उपग्रहांची छायाचित्रं पाठवली. या प्रवासात गुरूच्या उपग्रहांवरील ज्वालामुखींचाही अभ्यास करण्यात आला. त्यानंतर 12 नोव्हेंबर 1980 रोजी व्हॉयेजर-1 शनी ग्रहाजवळ पोहोचलं. शनीभोवती असलेल्या कड्यांचा आणि त्याच्या उपग्रहांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये टायटन या उपग्रहाची छायाचित्रंही मिळाली. त्यामुळे या यानांचा प्रवास केवळ अंतराळात दूर जाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर वाटेत येणाऱ्या ग्रहांचा आणि त्यांच्या उपग्रहांचा अभ्यास करणं हीदेखील या मोहिमेची महत्त्वाची बाजू होती.
मात्र, या प्रवासात पुढे अशी एक घटना घडली, जिने संपूर्ण मानवजातीला आपल्या अस्तित्वाचा विचार करायला भाग पाडलं. ही घटना घडली 1990 मध्ये. त्यावेळी व्हॉयेजर-1 पृथ्वीपासून खूप दूर गेलं होतं. नासाने या यानाला कॅमेरा पृथ्वीच्या दिशेने वळवून छायाचित्र घेण्याची सूचना दिली. यानाने कॅमेरा फिरवला आणि पृथ्वीची छायाचित्रं पाठवली. या छायाचित्रात आपली पृथ्वी अतिशय लहानशा निळ्या ठिपक्यासारखी दिसत होती. या छायाचित्राला ‘पेल ब्लू डॉट’ (Pale Blue Dot) असं नाव देण्यात आलं. या छायाचित्राची कल्पना वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी मांडली होती. सुरुवातीला नासाची टीम या छायाचित्रासाठी फारशी तयार नव्हती. कारण यानाचा कॅमेरा फिरवण्यासाठी काही आवश्यक बदल करावे लागणार होते. मात्र, अखेर यानाला पृथ्वीच्या दिशेने कॅमेरा वळवण्याची सूचना देण्यात आली आणि हे ऐतिहासिक छायाचित्र मिळालं.
या छायाचित्रात आपण ज्या पृथ्वीवर राहतो, जिथे देशांच्या सीमा आहेत, युद्धं होतात आणि जमिनीवरून संघर्ष होतात, तीच पृथ्वी अंतराळातून अतिशय लहान दिसते. संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व एका छोट्याशा निळ्या ठिपक्यात सामावलेलं दिसतं. एवढ्या विशाल विश्वात आपली पृथ्वी किती लहान आहे आणि याच छोट्याशा पृथ्वीवर राहून आपण किती गोष्टींसाठी एकमेकांशी संघर्ष करत असतो, असा विचार या छायाचित्रातून समोर आला. या छायाचित्रावरून अनेक तात्त्विक चर्चा झाल्या. कार्ल सेगन यांनी याच नावाने पुढे ‘Pale Blue Dot: A Vision of the Human Future in Space’ हे पुस्तकही लिहिलं.
व्हॉयेजर-1 चा प्रवास मात्र इथेच थांबला नाही. 1998 मध्ये या यानाने सर्वाधिक दूर गेलेल्या मानवनिर्मित वस्तूचा विक्रम मिळवला. 2004 मध्ये त्याने हेलिओशिथ पार केलं. त्यानंतर 2012 मध्ये हे यान इंटरस्टेलर स्पेसमध्ये पोहोचलं. म्हणजेच सूर्याच्या प्रभावक्षेत्राबाहेर जाऊन ते आंतरतारकीय अंतराळात प्रवास करू लागलं. 2013 मध्ये नासाने याची पुष्टी केली की व्हॉयेजर-1 सूर्याच्या प्रभावक्षेत्राबाहेर पोहोचलं आहे. आता 2026 मध्ये हे यान पृथ्वीपासून तब्बल 25.9 अब्ज किलोमीटर दूर गेलं आहे. म्हणजेच जवळपास 16.1 अब्ज मैल अंतर त्याने पार केलं आहे.
व्हॉयेजर-2 हे यानही पृथ्वीपासून जवळपास 21.7 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. त्याचाही अंतराळातील प्रवास सुरू आहे. मात्र, पृथ्वीपासून एवढ्या प्रचंड अंतरावर असलेल्या या यानांशी संपर्क कसा साधला जातो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हॉयेजर-1 पर्यंत पृथ्वीवरून पाठवलेला रेडिओ सिग्नल पोहोचण्यासाठी जवळपास 24 तास लागतात. त्यानंतर यानाने पाठवलेला संदेश पुन्हा पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आणखी 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीवरून एक संदेश पाठवला आणि त्याचं उत्तर मिळालं, तर या संपूर्ण संवादासाठी जवळपास 48 तास लागतात.
यासाठी नासाने जगातील तीन ठिकाणी मोठ्या अँटेना आणि रिसीव्हर्सची व्यवस्था केली आहे. स्पेनमधील माद्रिद, ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया या तीन ठिकाणी असलेल्या रिसीव्हर्सच्या मदतीने व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 कडून येणारे संदेश प्राप्त केले जातात. त्यानंतर वैज्ञानिक या संदेशांमधील माहितीचं विश्लेषण करतात आणि त्यातून मिळणाऱ्या डेटाचा अभ्यास करतात. म्हणजेच पृथ्वीपासून अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या यानाकडून आजही माहिती मिळवली जात आहे.
आता प्रश्न असा की, एवढी वर्षं अंतराळात प्रवास करणाऱ्या या यानाला ऊर्जा कुठून मिळते? व्हॉयेजर-1 मध्ये सौर पॅनेल नाहीत. या यानाला ऊर्जा मिळते ती एका विशेष तंत्रज्ञानातून. त्याला आरटीजी (RTG) म्हणजे रेडिओआइसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतात. या यंत्रणेमध्ये प्लुटोनियम-238 या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा वापर करण्यात आला आहे. या मूलद्रव्याच्या किरणोत्सर्गातून निर्माण होणाऱ्या उष्णतेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं. याच ऊर्जेच्या मदतीने यानातील संगणक आणि संशोधन उपकरणं कार्यरत राहतात.
मात्र, या यंत्रणेतून मिळणारी ऊर्जा दरवर्षी कमी होत चालली आहे. दरवर्षी जवळपास 4 वॅटने वीज निर्मिती कमी होत आहे. त्यामुळे यानातील सर्व उपकरणं सतत सुरू ठेवणं शक्य नाही. हळूहळू काही उपकरणं बंद करण्यात आली आहेत. यासाठी पृथ्वीवरूनच वैज्ञानिक यानाला कमांड पाठवतात. सुरुवातीला या यानामध्ये 10 वैज्ञानिक उपकरणं होती. मात्र आता त्यापैकी काहीच उपकरणं काम करत आहेत. सध्या चुंबकीय क्षेत्र आणि अंतराळातील चार्ज्ड पार्टिकल्स यांचा अभ्यास करणारी उपकरणं कार्यरत आहेत. याशिवाय संगणक आणि पृथ्वीशी रेडिओ संपर्क कायम ठेवण्यासाठीही उपलब्ध ऊर्जेचा वापर केला जात आहे. म्हणजेच जवळपास 49 वर्षं जुनं असलेलं हे यान आजही मर्यादित ऊर्जेवर आपलं काम करत आहे.
या 49 वर्षांच्या प्रवासात व्हॉयेजर-1 मध्ये अनेकदा तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. 2023 मध्ये तर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, व्हॉयेजर-1 कडून माहिती मिळणं बंद होईल, असं वाटू लागलं होतं. मात्र नासाच्या वैज्ञानिकांनी त्यावर काम केलं. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले आणि पुन्हा यानाकडून माहिती मिळवण्यात यश मिळवलं. आजही जवळपास 10 वैज्ञानिकांची टीम या मोहिमेवर काम करत आहे. या टीममध्ये 25 वर्षांचा तरुण कम्युनिकेशन इंजिनिअर आहे, तर व्हॉयेजर-1 लॉन्च झालं, त्यावेळी या मोहिमेच्या टीमचा भाग असलेली 90 वर्षांची व्यक्तीदेखील आज या कामात सहभागी आहे. त्यामुळे एका बाजूला 49 वर्षांपासून अंतराळात प्रवास करणारे यान आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या वर्षांनंतरही त्याचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे वैज्ञानिक, असं या मोहिमेचं चित्र आहे.
व्हॉयेजर मोहिमेतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही यानांसोबत पाठवण्यात आलेला विशेष संदेश. हा संदेश पृथ्वीवरील एखाद्या देशासाठी किंवा वैज्ञानिकांसाठी नव्हता, तर अंतराळात कुठेतरी दुसरीकडे जीवसृष्टी असेल, तर त्यांच्यासाठी पाठवण्यात आला होता. या दोन्ही यानांमध्ये एक विशेष डिस्क बसवण्यात आली आहे. तिला गोल्डन रेकॉर्ड (Golden Record) असं म्हणतात. ही सुमारे 30 सेंटीमीटर आकाराची सोन्याचा थर असलेली तांब्याची डिस्क आहे. या डिस्कमध्ये मानवजातीशी संबंधित अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 115 छायाचित्रं, वेगवेगळे नैसर्गिक आवाज, संगीत आणि तब्बल 55 भाषांमधील अभिवादनं आहेत. समुद्राच्या लाटा, वारा, पाऊस आणि विजांचा कडकडाट अशा नैसर्गिक आवाजांचाही या डिस्कमध्ये समावेश करण्यात आला आहे.
भविष्यात कधीतरी एखाद्या परग्रहावरील जीवाला ही डिस्क सापडली, तर त्याला पृथ्वीवरचं जीवन कसं आहे, मानव कोण आहे आणि आपली पृथ्वी कशी आहे, याची माहिती मिळावी, अशी यामागची कल्पना होती. म्हणजेच व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 ही यानं केवळ वैज्ञानिक माहिती गोळा करण्यासाठी पाठवण्यात आली नव्हती, तर त्यांच्यासोबत मानवजातीची ओळख सांगणारा एक संदेशही अंतराळात पाठवण्यात आला होता.
आजही व्हॉयेजर-1 अंतराळात प्रवास करत आहे. मात्र, आता ते पृथ्वीची छायाचित्रं काढत नाही. उपलब्ध असलेल्या उपकरणांच्या माध्यमातून अंतराळातील माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवणं, हे त्याचं प्रमुख काम आहे. वैज्ञानिकांच्या मते, 2029 नंतर व्हॉयेजर-1 सोबतचा संपर्क कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास पाच दशकांपासून सुरू असलेला हा संवाद कधीतरी थांबू शकतो. मात्र, या यानाने आतापर्यंत जे काही मिळवलं आहे, ते अंतराळ संशोधनाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचं आहे. पृथ्वीपासून 25.9 अब्ज किलोमीटर दूर असलेलं यान, त्याच्याशी संपर्क ठेवण्यासाठी 24 तास वाट पाहणारे वैज्ञानिक आणि मानवजातीचा संदेश घेऊन अंतराळात प्रवास करणारी गोल्डन रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टी व्हॉयेजर मोहिमेला वेगळं महत्त्व देतात.
49 वर्षांपूर्वी पृथ्वीवरून सुरू झालेला हा प्रवास आजही सुरू आहे. या प्रवासातून मानवाला आपल्या सौरमालेबद्दल, अंतराळाबद्दल आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजल्या आहेत. व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 या दोन्ही यानांचा प्रवास विज्ञानाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा ठरला आहे.