‘डेथ कॅप मशरूम’ काय आहे? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात विषारी मशरूमचा उल्लेख का?
पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी विषारी मशरूम आणि त्याच्या वापरासंदर्भात इंटरनेटवर माहिती शोधली होती.
What is the ‘death cap mushroom’? : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात तब्बल 5 हजार 53 पानी आरोपपत्र दाखल केलं असून, या आरोपपत्रात तपासादरम्यान समोर आलेले डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल डिटेल रेकॉर्ड, छायाचित्रं आणि साक्षीदारांचे जबाब यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून, तपास पुढे गेल्यानंतर कथित हत्येचा कट समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या आरोपपत्रातील चर्चेत आलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे डेथ कॅप मशरूमचा शोध.
पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी विषारी मशरूम आणि त्याच्या वापरासंदर्भात इंटरनेटवर माहिती शोधली होती आणि या डिजिटल सर्चला पोलिसांनी कथित कटाच्या सुरुवातीच्या टप्प्याशी जोडलं आहे. डेथ कॅप या नावाने ओळखला जाणारा मशरूम म्हणजे अमानिटा फॅलॉइड्स असून, तो अत्यंत विषारी मानला जातो. त्यातील विषारी घटकांमुळे यकृतासह शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर नुकसान होऊ शकतं आणि गंभीर विषबाधा जीवघेणी ठरू शकते. मात्र, मशरूमसंदर्भातील सर्च हा पोलिसांच्या तपासातील दावा असून, त्याबाबतचा अंतिम न्यायालयीन निष्कर्ष अद्याप झालेला नाही.
शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत! पाकिस्तानला अखेरच्या चेंडूवर धक्का; भारतानं जिंकलं आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांच्या डिजिटल सर्चमध्ये हत्या, विषबाधा आणि याआधी घडलेल्या अशाच घटनांशी संबंधित माहितीचा शोध घेण्यात आला होता. तपासात 2025 मध्ये लोहगडवर झालेल्या एका महिलेच्या मृत्यूच्या घटनेबाबतही ऑनलाइन सर्च झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय सोनम रघुवंशी हत्या प्रकरणाशी संबंधित सर्चचाही आरोपपत्रात उल्लेख असल्याचं वृत्त आहे. तपासातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतनला लोहगडवर नेण्याची कथित योजना. पोलिसांच्या आरोपानुसार, आरोपींनी माही नावाचं बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून केतनशी संपर्क साधला आणि त्याला लोहगडवर येण्यासाठी प्रवृत्त केलं.
त्यानंतर 18 जून रोजी लोहगडवर केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे हे आरोपी असल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केलं आहे. या संपूर्ण प्रकरणात डिजिटल पुराव्यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून, पोलिसांनी आरोपींचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करून डिलीट केलेले चॅट्स आणि इतर डिजिटल डेटा फॉरेन्सिक पद्धतीने मिळवल्याचं समोर आलं आहे. आरोपपत्रात सुमारे 80 ते 85 साक्षीदारांचे जबाब आणि विविध तांत्रिक पुराव्यांचाही समावेश असल्याचं वृत्त आहे. याशिवाय चार्जशीटमध्ये चॅट जीपीटीशी संबंधित सर्चचाही उल्लेख असल्याचं वृत्त आहे.
पुणे शिक्षक, पदवीधर मतदार संघ भाजपला; चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या व्यक्तीला ‘शिक्षक’चे तिकीट फिक्स
पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या मृत्यूनंतर सियाने स्वतःला लोकांसमोर कसं दाखवावं, यासंदर्भात चॅट जीपीटीवर माहिती घेतल्याचा आरोप आहे. या डिजिटल नोंदींचाही तपासातील पुरावा म्हणून विचार करण्यात आला आहे. एकूणच, केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 5 हजार 53 पानी आरोपपत्रात कथित कटाची तयारी, लोहगडवरील घटना आणि त्यानंतर करण्यात आलेल्या डिजिटल हालचालींचा तपशील देण्यात आला आहे. डेथ कॅप मशरूमपासून विविध हत्या प्रकरणांवरील सर्च, बनावट सोशल मीडिया अकाउंट आणि चॅट जीपीटीशी संबंधित डिजिटल नोंदींपर्यंत अनेक बाबी पोलिसांच्या तपासाचा भाग आहेत. आता या आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रियेत पुढील पुरावे आणि निष्कर्ष काय समोर येतात, याकडे लक्ष लागलं आहे.