तुम्हालाही सतत स्क्रिनशॉट घ्यायची सवय आहे? संशोधनामध्ये समोर आलं धक्कादायक वास्तव…
screenshots घ्यायची सवय असणाऱ्या लोकांच्या स्मरणशक्तीवर त्याचा परीणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
habit of constantly taking screenshots Research revealed shocking reality : सोशल मिडीयावर स्क्रोलिंग करता करता आपण अनेकदा अनेक गोष्टी पुढे कधी कामी येतील म्हणून त्या सेव्ह करतो किंवा त्यांचे स्क्रिनशॉट घेतो. आपल्याला वाटतं आपण ही गोष्ट आता आपल्याजवल कायची जपून ठेवत आहोत. मात्र ही सवय आपल्याला खूप महागात पडू शकते. कारण नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनामध्ये अशा प्रकारे सतत स्क्रिनशॉट घ्यायची सवय असणाऱ्या लोकांच्या स्मरणशक्तीवर त्याचा परीणाम होत असल्याचं समोर आलं आहे. मात्र स्मरणशक्तीवर नेमका काय परीणाम होतो? जाणून घ्या सविस्तर…
अमेरिकेतील विद्यापीठात झाले संशोधन
मोबाईलवर सतत फोटो काढण्याची किंवा स्क्रीनशॉट घेण्याची सवय आपल्या स्मरणशक्तीसाठी हानिकारक ठरू शकते, असा दावा अमेरिकेतील बिंघॅम्टन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या संशोधनानुसार, एखादी गोष्ट फोटोमध्ये साठवून ठेवण्यापेक्षा ती प्रत्यक्ष लक्षपूर्वक पाहिल्यास तिचे तपशील अधिक काळ लक्षात राहतात.संशोधकांनी या परिणामाला ‘फोटो-टेकिंग इम्पेअरमेंट इफेक्ट’ असे नाव दिले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, एखाद्या गोष्टीचा फोटो काढणाऱ्या व्यक्तीपेक्षा ती गोष्ट फक्त बारकाईने पाहणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणात तिची अधिक माहिती राहण्याची शक्यता असते.
संशोधन कसे करण्यात आले?
या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांना काही पेंटिंग्ज आणि स्केचेस दाखवण्यात आले. यापैकी काही कलाकृतींचे स्क्रीनशॉट घेण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, तर काही कलाकृती केवळ लक्ष देऊन पाहण्यास सांगण्यात आल्या.यानंतर विद्यार्थ्यांना त्या कलाकृतींशी संबंधित विविध तपशीलवार प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी असे दिसून आले की, ज्या चित्रांचे स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी घेतले होते, त्याबाबत त्यांना तुलनेने कमी माहिती आठवत होती. मात्र, ज्या चित्रांकडे त्यांनी फक्त लक्षपूर्वक पाहिले होते, त्यांचे तपशील त्यांना अधिक अचूकपणे आठवत होते.
संशोधनातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष
या अभ्यासातील विशेष बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांना आपण नेमक्या कोणत्या चित्राचा स्क्रीनशॉट घेतला होता, हे देखील आठवत नव्हते. मात्र, ज्या चित्रांचे स्क्रीनशॉट घेतले नव्हते, त्याबाबत त्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असल्याचे दिसून आले.यावरून असे संकेत मिळतात की, माहिती मोबाईलमध्ये सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर मेंदू ती माहिती स्वतः लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कमी करू शकतो.
स्क्रीनशॉट घेण्याची सवय का ठरू शकते नुकसानकारक?
संशोधकांच्या मते, यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे लक्ष विचलित होणे. फोटो किंवा स्क्रीनशॉट घेताना आपले लक्ष मोबाईल, बटण आणि स्क्रीन सेटिंग्जकडे जाते. त्यामुळे समोरच्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करण्याकडे कमी लक्ष दिले जाते.दुसरे कारण म्हणजे कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग. म्हणजेच, एखादी माहिती फोनमध्ये सेव्ह केली असल्याने ती पुन्हा लक्षात ठेवण्याची गरज नाही, असे मेंदू गृहीत धरतो. उदाहरणार्थ, मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्यामुळे अनेकांना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींचे फोन नंबरही पाठ नसतात.
स्क्रीनशॉटऐवजी लिहून ठेवण्याचा सल्ला
संशोधकांनी महत्त्वाची माहिती दीर्घकाळ लक्षात ठेवायची असल्यास तिचा फक्त स्क्रीनशॉट घेण्याऐवजी ती डायरीत किंवा कागदावर लिहून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. लिहिताना मेंदू त्या माहितीवर अधिक विचार करतो आणि ती समजून घेण्याची प्रक्रिया सक्रिय होते. त्यामुळे ती माहिती अधिक काळ स्मरणात राहण्यास मदत होऊ शकते. संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लोक मोठ्या प्रमाणावर फोटो काढत आहेत. मात्र, प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात त्या क्षणाचा अनुभव प्रत्यक्षात जगण्यापेक्षा आपण तो फक्त डिजिटल स्वरूपात साठवून ठेवत आहोत का, असा प्रश्न या संशोधनामुळे उपस्थित झाला आहे.