सावधान! स्मार्टफोनच्या अतिवापराने मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात; मुलांमध्ये होतोय ‘हा’ बदल

Effect of Smartphone on Children : मुलांच्या हातात स्मार्टफोन आज ही एक अगदी कॉमन गोष्ट झाली आहे. शाळा असो की कॉलेज असो किंवा बाहेर भटकंती प्रत्येक वेळी स्मार्टफोन असतोच असतो. पण या गोष्टीचा विचार तुम्ही कधी केला आहे का की या लहानशा वस्तूचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो. सॅपियन लॅब्सने नुकत्याच केलेल्या द यूथ माइंड : रायझिंग अॅग्रेशन अँड अँगर या अभ्यासात याबाबत सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे.
या अहवालात भारत आणि अमेरिकेतील 13 ते 17 वयोगटातील मुलांच्या बाबतीत माहिती देण्यात आली आहे. ज्यावेळी मुले अगदी कमी वयात स्मार्टफोन्सचा वापर करू लागतात त्यावेळी त्यांच्या मानसिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. स्मार्टफोनचा अतिवापर केल्याने मुलांमध्ये आक्रमकता, राग, चिडचिडेपणा वाढतो. मुलांमध्ये कमी वयात होणारे हे बदल त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच घातक आहेत.
अहवालात नेमकं काय
या अहवालात म्हटले आहे की ज्या मुलांनी अगदी कमी वयातच स्मार्टफोनचा वापर सुरू केला असेल त्या मुलांत मानसिक समस्या अधिक गंभीर होत आहेत. यामुळे मुलांत राग, चिडचिडेपणा आणि आक्रमकता वाढीस लागली आहे. याव्यतिरिक्त काही नवीन लक्षणेही दिसू लागली आहेत. सतत दुःखी राहणे आणि चिंता वाटणे अशी काही लक्षणे मुलांत दिसत आहेत. तसेच मुलांना नेहमी नकारात्मक आणि त्रास होईल असे विचार येत राहतात. काही मुलांना तर वास्तविक जगापेक्षा वेगळेच काहीतरी भास होत असतात ही स्थिती निश्चितच काळजीत टाकणारी आहे.
मुलांना झटका पालकांना चिंता! अपस्माराची माहिती घ्या अन् सावध राहा..
लहान वयात स्मार्टफोनचा वापर सुरू केल्याने ज्या गोष्टी मुलांनी पाहू नयेत अशा गोष्टी त्यांना इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापराने मुलांच्या झोपेवरही परिणाम होत आहे. लोकांशी भेटण्याचे प्रमाणही कमी होते. याचा परिणाम मुलांच्या सोशल स्किल्स म्हणजेच समाजात मिसळण्याच्या क्षमतेवर होतो.
मुलांच्या तुलनेत मुलींवर जास्त परिणाम
मुलांच्या तुलनेत मुलींवर स्मार्टफोनच्या अतिवापराचा अति परिणाम होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. मुलींमध्ये जास्त आक्रमकता आणि राग दिसत आहे. या अभ्यासात सहभागी 65 टक्के मुलींना मानसिक समस्या जाणवत असल्याचे स्पष्ट झाले. मुलांच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे.
अमेरिकेच्या तुलनेत भारत बरा
अमेरिकेच्या तुलनेत भारतात मानसिक आरोग्याची स्थिती वेगळी आहे. अमेरिकेत महिला आणि पुरुष दोघांतही मानसिक आरोग्य वेगाने ढासळत चालले आहे. भारतात स्थिती मात्र थोडी वेगळी आहे. येथे फक्त महिलांमध्येच मानसिक स्वास्थ्य ढासळत चालल्याचे दिसत आहे. पुरुषांत काही प्रकरणात सुधारणा होत आहे. याचा अर्थ भारतात महिला मानसिक समस्यांचा जास्त सामना करत आहेत.
प्लास्टिकमध्ये जेवण करताय? सावध व्हा, शरीराला ‘या’ गंभीर आजारांचा धोका..
डिजिटल उपकरणांचा मुलांवर दोन्ही प्रकारे परिणाम होत आहे. एका बाजूला इंटरनेट आणि सोशल मीडियाने शिक्षण सुलभ केले आहे. यामुळे लाखो मुलांना सहजासहजी शिक्षण मिळत आहे. तर दुसरीकडे यामुळे मुले काही धोकादायक गोष्टींच्या संपर्कात येण्याची शक्यता राहते. म्हणजेच डिजीटल उपकरणांचा वापर फायदेशीर आणि नुकसानदायकही ठरू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना या उपकरणांचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करण्यास शिकवता यावर बरेच काही अवलंबून आहे.